उजनी धरणाचे पाणी उचलून इंदापूर आणि बारामती तालुक्यास देण्याच्या शासनाच्या निर्णयाला काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांनी तीव्र विरोध केला आहे. या प्रश्नावर रान पेटविण्याचा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी सोलापूरच्या विकासाची जबाबदारी विसरून स्वतःच्या इंदापूर आणि बारामतीच्या फायदा पाहिला आहे. यामागे त्यांचा स्वार्थ दडला आहे. परंतु आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोलापूरकरांच्या हक्काचे उजनीचे पाणी इंदापूर व बारामतीला जाऊ देणार नाही, त्यासाठी किंमत मोजायला तयार आहोत, असाही इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी दिला आहे.
उजनी धरणातील पाणी लाकडी- निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या नावाखाली इंदापूर व बारामती तालुक्यातील १७ गावांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी ३४८ कोटी रूपये खर्चास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यातून विरोध वाढू लागला असून त्याविरोधात आंदोलनही पेटले आहे.
उजनीचे हक्काचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना अद्यापि मिळाले नाही. एकरूख, शिरापूर, आष्टी, मंगळवेढा, सांगोला, दहिगाव यासारख्या सिंचन योजना प्रलंबित राहिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बहुसंख्य भागाला पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. हे प्रश्न सोडविण्यापेक्षा भरणे यांना स्वतःच्या इंदापूरच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात रस आहे. म्हणजे ते सोलापूरचे पालकमंत्री आहेत की इंदापूरचे, असा सवाल आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. उजनीच्या पाण्याच्या प्रश्नावर आपण अजिबात तडजोड करणार नाही. आपणांस सत्तेशी काहीही देणेघेणे नाही. आपण लहानपणापासूनच सत्ता पाहिली आहे, असेही त्यांनी सुनावत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा