सोलापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि संपूर्ण भारत देशाविषयी अभिमान वाटत नसेल तर संभाजी भिडे यांनी देशातून चालते व्हावे, अशी मागणी करीत, काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विषयी अवमानकारक वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे यांच्यावर राज्यातील भाजप सरकार कठोर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालून दुटप्पी राजकारण खेळत असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला. परदेशात गांधीजींचे गुणगान गायचे आणि देशात गांधीजींविषयी गलिच्छ विधाने करणा-यांना पाठीशी घालणा-या मोदी सरकारने हिंमत असेल तर सर्व शासकीय कार्यालयांतील गांधीजींच्या प्रतिमा हटवून दाखवाव्यात, असे आव्हानही त्यांनी दिले.
हेही वाचा >>> “उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी अशा तिघांनी ठरवलं, तर…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याची जोरदार चर्चा
शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीजींच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करून देशवासियांच्या भावना दुखावल्या निषेधार्थ सोलापुरात सायंकाळी रेल्वे स्थानकासमोरील गांधीजींच्या पुतळ्याजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्यात आली. भर पावसात झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व करताना आमदार शिंदे बोलत होत्या. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, विनोद भोसले, अंबादास करगुळे, राजन कामत, ॲड. मनीष गडदे, हेमा चिंचोळकर, ॲड. करिमुन्निसा बागवान, केशव इंगळे, गणेश डोंगरे आदींचा या आंदोलनात सहभाग होता. आमदार शिंदे यांनी संभाजी भिडे आणि भाजपसह मोदी सरकारच्या कार्यपध्दतीवर कठोर शब्दात टीका केली. समाजात जातीयद्वेष निर्माण केला जात असून यात संभाजी भिडेंसारख्या व्यक्ती नेहमीच अग्रभागी राहिल्या आहेत. भाजपने भिडे यांच्याबद्दलचे नाते काय, हे जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.