विधानपरिषदेतील ज्या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत झाला, त्यांना आज निरोप देण्यात आला. यामध्ये भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचाही समावेश होता. निरोपाच्या भाषणात बोलताना प्रसाद लाड यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती दिली. तसेच हमाली करण्यापासून ते आमदार होण्यापर्यंतचा संघर्ष सांगितला. यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल माहिती दिली. वयाच्या १९व्या वर्षी आपण विधानपरिषद सदस्याच्या मुलीला पळवून नेत प्रेमविवाह केला होता, असा खुलासा प्रसाद लाड यांनी केला.
“लग्नासाठी वयाची १८ वर्ष पूर्ण असल्याची अट होती. मी १९व्या वर्षी लग्न केलं आणि २१ व्या वर्षी मुलगी झाली. जयंत पाटलांमुळे सिद्धीविनायक न्यासाचा मी ३१ व्या वर्षी विश्वस्त झालो. तेव्हा शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ हे तिथे विश्वस्त होते. वडील १९६८ मध्ये शिवसैनिक होते. परळमध्ये छोट्याशा खोलीत राहायचो. कॉलेजमध्ये शिकता शिकता प्रेमप्रकरण सुरू झालं. माझ्या पत्नीचे वडील बाबुराव भापसे विधानपरिषद सदस्य होते. दोन वेळा विधानपरिषद आणि एक वेळा विधानसभेचे आमदार राहिले. त्यावेळी त्यांचा मुंबईमधला रुबाब जेव्हा पाहायचो, त्यावेळीच ठरवलेलं की आयुष्यात एकदा तरी आमदार व्हायचं,” असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.
“त्याकाळी बाबुराव भापसे यांची मुलगी मुंबईतून पळवून नेऊन लग्न करणं ही खुप मोठी गोष्ट होती. खिशात पैसे नव्हते. मग मी मेहनत करायला सुरुवात केली. टाईम्स ऑफ इंडियात मी हमाली करायचो. त्याचे ७० रुपये मला मिळायचे. त्यापैकी ४० रुपये बायकोला द्यायचो आणि ३० रुपयांनी विद्यार्थी काळातलं राजकारण करायचो. अशाप्रकारे संघर्षातून सगळं मिळवलं,” अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.
“राजकारणात शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी जी संधी दिली, त्या संधीचं मी सोनं केलं,” असं ते म्हणाले.