Pratap Sarnaik Thackeray Group : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीत खटके उडायला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील तिनही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आहेत. यातच पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची महत्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असल्याचं बोललं जातं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. दरम्यान, असे असताना आता शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक आमच्या (शिंदे गटाच्या) आणि भाजपाच्या संपर्कात असल्याचं विधान प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : “हत्यारे व गुंडांच्या जोरावर मतदान केंद्र ताब्यात, विरोधी उमेदवार, पोलिसांना दमदाटी”, आव्हाडांनी शेअर केला परळीतला धक्कादायक VIDEO

प्रताप सरनाईक काय म्हणाले?

“शिवसेना ठाकरे गटाचे ३६ माजी नगरसेवक आमच्याकडे आले आहेत. तसेच अजूनही काही माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, तर काही माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत. महापालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, जेव्हा महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील तेव्हा तुम्हाला चित्र दिसेल की ठाकरे गटाकडे स्वत:चे फक्त काहीच नगरसेवक राहतील. मात्र, दोन अंकी नगरसेवक त्यांच्याकडे असणार नाहीत, अशी परिस्थिती ठाकरे गटाची होईल”, असा दावा प्रताप सरनाईक यांनी केला.

“आता महायुतीत ज्या प्रकारे काम होत आहेत, आधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक विकास कामे झाले. आता महायुतीच्या मंत्र्‍यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतल्या घेतल्या कामाला सुरुवात केली आहे. आम्हाला लाडक्या भावांचा आणि लाडक्या बहि‍णींचा मोठा आशीर्वाद मिळालेला आहे. त्यामुळे जर आमच्या पक्षावर माजी नगरसेवक खूश असतील आणि महायुतीत चांगली कामे होतात म्हणून जर आमच्या विचाराशी बांधिल असणारे आमच्याकडे येत असतील तर त्यात नवखं काय? त्यामुळे येणाऱ्यांचं आम्ही स्वागत करू”, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla pratap sarnaik on former corporator of shivsena thackeray group in touch with shivsena shinde group in mumbai politics gkt