Rohit Pawar On Ajit Pawar : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आली. या घटनेचे पडसाद सध्या राज्यभरात उमटताना दिसत आहेत. या प्रकारानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनीही आरोपीच्या शोधासाठी १३ पथके तैनात केली आहेत. या आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. पुण्यातील बलात्कार प्रकरण आणि बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे शंका रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वारगेट बसस्थानकात घडलेली बलात्काराची घटनेतील आरोपी आणि मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी फरार असल्याच्या मुद्द्यावर रोहित पवारांनी भाष्य केले आहे. स्थानिक गुन्हेगार अद्याप पकडला गेला नाही हे न पटणारं असल्याचेही रोहित पवार म्हणालेत. बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे अजित पवारांकडे आहे. दरम्यान मस्साजोग आणि स्वारगेट या प्रकरणात जाणूनबुजून तपास संथ गतीने करण्याच्या सूचना पोलिसांना देऊन पालकमंत्र्यांवर कुरघोडी केली जात असल्याची चर्चा आहे, असे रोहित पवार त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणाले आहेत

रोहित पवार नेमकं काय म्हणालेत?

“बलात्कारासारखा भयानक गुन्हा करणारा एक लोकल गुन्हेगार अद्यापही पकडला गेलेला नाही, हे न पटणारं आहे. मस्साजोग प्रकरणातही एक आरोपी अद्याप फरार आहे शिवाय तपासही मंदावलेला आहे. मस्साजोग (बीड) आणि स्वारगेट (पुणे) प्रकरणात जाणूनबुजून तपास संथ गतीने करण्याच्या पोलिसांना सूचना देऊन पालकमंत्र्यांवर कुरघोडी केली जात असल्याची चर्चा आहे,” असे रोहित पवार म्हणाले आहेत.

“अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणात संवेदनशील प्रकरणांना तरी वगळायला हवं, परंतु त्यातही राजकिय कुरापती केल्या जात असतील अशा राजकारणाला काय म्हणावं? राजकारणातील हा कोडगेपणा महाराष्ट्रात नव्यानेच पहायला मिळत आहे,” अशी खंतही रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार घोषित करण्यात आला आहे. त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास बक्षिस देखील जाहीर करण्यात आले आहे. तसेच आरोपीच्या शोधासाठी डॉग स्क्वाड आणि ड्रोनचीही मदत घेतली जात आहे.