अलिबाग: शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या पाठोपाठ राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. साळवी यांच्या बेकायदेशीर मालमत्तांची रायगडच्या लाचलुचपत विभागाने बुधवारी चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे साळवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार साळवी यांना मालमत्तेच्या उघड चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. ५ डीसेंबर २०२२ रोजी सकाळी अकरा वाजता ही चौकशी होणार होती. मात्र आमदार साळवी हजर यांनी वेळ मागून घेतली होती. त्यानुसार ते बुधवारी दिनांक १४ डिसेंबर २२ रोजी अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात सकाळी साडे अकरा वाजता दाखल झाले.
हेही वाचा: ठाकरे गटाचे आणखी एक नेते अडचणीत; आमदार राजन साळवींची उद्या ‘एसीबी’कडून चौकशी
यावेळी शिवसैनिक आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. पोलीसांनी आमदार साळवी यांच्या समवेत त्यांचे बंधु आणि स्विय साहाय्यक या दोघांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात प्रवेश दिला. त्यानंतर प्रत्यक्ष चौकशीला सुरवात झाली. साडे चार तास ही चौकशी सुरु होती. चारच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर आले. शिवसैनिकांनी त्यांच्या नावाच्या जोरदार घोषणा देऊन त्यांचे स्वागत केले. आमदार साळवी यांनी त्यांचे आभार मानले. यानंतर ते रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाले. साळवी यांच्या चौकशीच्या पार्श्वभुमीवर एसीबी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कार्यालय परिसरात जमाव बंदी आदेश लागू करण्यात आले होते. अशा कितीही नोटीसा आल्या तरी मी घाबरणार नाही, माझे काम मी करत राहीन, शिवसेना प्रमुखांनी आम्हाला रडायचे नाही तर लढायचे अशी शिकवण दिली आहे. त्यामुळे अशा नोटीसांचा मला फरक पडणार नाही. या चौकशीला मी ठाम पणे सामोरे जाणार असून, यातून काही निष्पन्न होणार नाही भ्रमाचा भोपळा नक्की फुटेल असा विश्वास आमदार साळवी यांनी यावेळी व्यक्त केला.