वाळू वाहतुकीमुळे खराब होणारे रस्ते दुरूस्त करण्याच्या प्रश्नावर सोलापुरात राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे व जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक दत्तात्रेय मंडलिक यांना उद्देशून अश्लील भाषेत शिव्यांची लाखोली वाहिली आणि चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात पोलिसांनी अद्यापि कारवाई केली नाही यासंदर्भात कारवाईसाठी स्थानिक पोलीस प्रशासन शासनाच्या आदेशाची वाट पाहत आहे.
मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार रमेश कदम व जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्यात संघर्षांची ठिणगी गेल्या महिन्यातच पडली होती. लोकप्रतिनिधीने बोलावलेल्या बैठकांना शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असा आदेश जिल्हाधिकारी मुंडे यांनी शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेऊन काढला होता. त्यामुळे आमदार कदम यांनी संतापून जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर आता वाळू वाहतुकीमुळे खराब होणारे रस्ते अगोदर दुरूस्त करावेत आणि मगच वाळू वाहतूक व्हावी, अशी मागणी पुढे करून आमदार कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन हाती घेतले. त्यातूनच एका तलाठय़ाला केलेल्या कथित मारहाणप्रकरणी आमदार कदम यांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने कदम व मुंडे यांच्यातील संघर्ष उफाळून आला. यात सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय मंडलिक यांनीही आमदार कदम यांची फिर्याद घेण्यास नकार दिल्याने संतापलेले आमदार कदम यांनी या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘लक्ष्य’ करीत मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांपुढे भाषण करताना आमदार कदम यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या विरोधात सभ्यता गुंडाळून अश्लील शिव्यांची लाखोली वाहिली. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरातील महिलांच्या अंतर्वस्त्रांपर्यंत हात घालण्यापर्यंत त्यांची मजल गेली. दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोटारीवर दगडफेक करा, चपला व लाकडी बांबूंनी हल्ला करा आणि पळवून लावा, अशा शब्दांत आमदार कदम यांनी मोर्चेकऱ्यांना चिथावणी दिल्यामुळे मोच्र्यातील महिलांनी जागेवरच उभे राहून पोलिसांना चपला दाखवल्या.
यासंदर्भात सोलापूर पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेने तसेच राज्य गुप्त वार्ता विभागाने राज्य शासनाकडे अहवाल पाठवला आहे. त्यानुसार शासनाकडून आदेश आल्यानंतर आमदार कदम यांच्याविरोधात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करता येईल. किंवा महसूल यंत्रणेकडून थेट फिर्याद दिल्यास गुन्हा दाखल होऊ शकेल, असे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी स्पष्ट केले. तर जिल्हाधिकारी मुंडे यांनी, आमदार कदम यांच्याकडून शिवीगाळ व दमदाटी होण्याचा प्रकार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारा आहे. त्यास आपण बळी पडणार नाही, असे निक्षून सांगितले. लोकप्रतिनिधींना आपले प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ खुले आहे. परंतु त्या व्यासपीठाचा वापर न करता प्रशासनावर थेट दबाव आणणे व धाक दडपशाही दाखविणे योग्य नाही. जिल्हाधिकारी म्हणून शासनाची धोरणे, अंमलबजावणी करणे, आपले कर्तव्य पार पाडताना कोणत्याही दबावाला बळी न पडता अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहू, अशी भूमिका मुंडे यांनी स्पष्ट केली.

Story img Loader