लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आíथक विकास महामंडळात झालेला घोटाळा ही आपली चूकच असल्याची कबुली या महामंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे वादग्रस्त आमदार रमेश कदम यांनी दिली.
मोहोळ येथे पोलीस ठाण्यावर गेल्या ४ जुलै रोजी आपण काढलेला ‘अटक मोर्चा’ आणि त्या वेळी घडलेल्या िहसक घटनेप्रकरणी पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली आपल्या विरोधात दाखल झालेला गुन्हा खोटा आणि अन्यायकारक आहे. त्याबद्दल आपण शासनाच्या विरोधात दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही आमदार कदम यांनी स्पष्ट केले.
रविवारी सायंकाळी येथे एका पत्रकार परिषदेत आमदार कदम यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडताना काही वादग्रस्त विधाने केली.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आíथक विकास महामंडळात अध्यक्षपदावर आपण कार्यरत असताना महामंडळात आíथक घोटाळा उघडकीस आला आहे. यात आपलीही चूकच झाल्याचे स्पष्ट करताना आमदार कदम यांनी तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाच्या कार्यकाळात त्या वेळच्या सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी दिलेल्या पत्रांनुसार काही कामे कायदा बाजूला ठेवून केली. परंतु यात चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे, असे नमूद केले.
सोलापूर-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर मोहोळ येथे उड्डाणपुलाखाली मोकळय़ा जागेत अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून प्रशासनाने लावलेली जाळी परस्पर तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात आमदार रमेश कदम व इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असता स्वत:ला अटक करून घेण्यासाठी आमदार कदम यांनी गेल्या ४ जुलै रोजी मोहोळ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. त्या वेळी हिंसक वळण लागून दगडफेक व पोलीस लाठीमार झाला होता. याप्रकरणी आमदार कदम यांच्यासह इतर समर्थकांना दहा दिवस न्यायालयीन कोठडीत बसावे लागले होते. यासंदर्भात आपले म्हणणे मांडताना आमदार कदम यांनी, आम्ही पोलिसांवर हल्ला केलेला नसताना आमच्या विरुद्ध चुकीचे आरोप लावून गुन्हा दाखल केल्याने त्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकशाहीर साठे आíथक विकास महामंडळातील कथित घोटाळय़ात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आदेश दिला तर आमदारकीचा राजीनामा देणार काय, असा प्रश्न विचारला असता, राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले. मोहोळ राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील हे ‘अतिशहाणे’ असल्याचा टोमणाही आमदार कदम यांनी मारला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा