धाराशिव : दि. २६ : पुरातत्व खात्याने केलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झाला आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिराचे प्राचीन शिखर चुना आणि जुन्या विटांपासून तयार करण्यात आलेले आहे. त्यावर नंतरच्या काळात अडीच फूट जाडीचे नवे सिमेंट काँक्रीटचे व दगडांचे आवरण दिल्यामुळे वजन वाढले आहे. परिणामी मंदिराचे शिखर ज्या तुळईवर उभे आहे त्याच्या चार पैकी दोन दगडी शिळांना तडे गेले असल्याचा निष्कर्ष पुरातत्व विभागाने नमूद केला आहे. त्यामुळे संपूर्ण शिखर उकलून पुन्हा उभारले जाणार आहे. प्राचीन काळी ज्या प्रकारचे शिखर होते तसे मूळ शिखर साकारून त्याला सोन्याने मढविण्यात येणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

पुरातत्व खात्याने सादर केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार तुळजाभवानी देवी मंदिराच्या मूळ इमारतीवर सिमेंट काँक्रीट आणि दगडांचा अतिरिक्त बोजा पडला आहे. चुना आणि विटांपासून साकारण्यात आलेल्या प्राचीन शिखरावर अडीच फूट जाडीचे नवे सिमेंट काँक्रीटचे आवरण आहे. त्यामुळे जगदंबेच्या गाभाऱ्यातील तुळईच्या चार पैकी २ दगडी शिळांना तडे गेले आहेत असे स्पष्ट निरीक्षण नोंदवण्यात आले असल्याने मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे सर्व काढून पुरातन पद्धतीने परंतु पुन्हा नव्याने करणे आवश्यक आहे हे पुरातत्व विभागाचेच मत असल्यामुळे याबाबत कोणीही गैरसमज निर्माण करू नयेत असे आवाहन आ.पाटील यांनी केले आहे.

पुरातत्व खात्याने संरचनात्मक लेखापरिक्षण अहवालच्या (स्ट्रक्चरल ऑडिट) आधारे जे निष्कर्ष काढले आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. यामध्ये त्यांनी “मंदिर बांधकाम हे दगडामध्ये असले तरी मुळ मंदिराच्या बांधकामध्ये वारंवार बदल करण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात संरचनात्मक बदल झालेला आहे. सध्या मंदिरामध्ये शिखराचा अतिरिक्त भार।झाला।असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिखराची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच तुळजाभवानी मातेचे मंदिर हे भूकंप क्षेत्र ४ च्या आणि किल्लारीच्या भूकंप प्लांट झोनच्या ८० कि.मी.च्या आत असल्याने मंदिराच्या गर्भगृहाचे व शिखराचे काम करणे आवश्यक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. एकंदरीत संरचनात्मक लेखापरिक्षण अहवाल बघता मुख्य मंदिराच्या गर्भगृहाचे व शिखराचे काम करणे आवश्यक असून पुढील योग्य कार्यवाहीस्तव हा अहवाल सविनय सादर करीत असल्याचा सुस्पष्ट निष्कर्षही पुरातत्व खात्याने काढला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

मंदिर समितीच्या स्वउत्पन्नातुन मंदिर जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. गाभाऱ्यातील टाईल्स हटवून मूळ रूपातील दगडी गाभारा भविकांसमोर मांडण्यात येणार आहे. टाईल्स हटवण्याचे काम सुरू असताना गाभाऱ्यातील दगडी शिळांना तडे गेल्याचे निदर्शनास आले. या कामाच्या निमित्ताने ही बाब लक्षात आल्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळता आली आहे. त्यावर शास्त्रीय आणि अचूक पद्धतीने काम करण्यासाठी पुरातत्त्व खात्याच्या माध्यमातून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची शिफारस केली होती. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही आपण केलेल्या शिफारशीनुसार तात्काळ कारवाईचे निर्देश पुरातत्व विभागाला दिले होते. तोच अहवाल आता प्राप्त झाला असून मंदिराच्या शिखरावर सिमेंट काँक्रीटच्या अतिरिक्त वजनामुळे गाभाऱ्यातील शिळांना तडे गेल्याचा निष्कर्ष अहवालामुळे स्पष्ट झाले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

श्री तुळजाभवानी मंदिर शेकडो वर्ष जुने आहे. मंदिरामध्ये असलेले दगडी खांब, भिंती, मंदिराचे छत तसेच मंदिराचे शिखर आणि कळस या सर्व भागांची तपासणी शास्त्रोक्त पद्धतीने भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. आपल्या पुढील अनेक पिढ्यांना या मंदिरामधील प्राचीनता, मूळ कलाकुसर पाहता यावी आणि मूळ रूपातील कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी आणि मंदिराचे समाधानकारक दर्शन मिळावे यासाठीच पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून श्री तुळजाभवानी मंदिराचे प्राचीन रूप जतन करण्याचा प्रयत्न आहे. मंदिराची मूळ रचना कशा पद्धतीची आहे ? याची वस्तुनिष्ठ माहिती पुरातत्व खात्याने सादर केलेल्या अहवालाच्या निमित्ताने समोर आली आहे. आता त्याचा आधार घेऊन श्री तुळजाभवानी मंदिराचे प्राचीन स्वरूप जपण्यासाठी सर्वसमावेशक काम सुरू करणे गरजेचे आहे. भविष्यकाळातही तुळजाभवानी देवीचे मंदिर चिरंतन राहावे यासाठी पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून श्री तुळजाभवानी मंदिराचे मूळ रूप जतन करण्याचा आपला प्रयत्न आहे. मंदिराच्या पावित्र्याला आणि मूळ पुरातन स्वरूपाला कोणताही धक्का न लावता हे काम केले जाणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. 

सहा महिन्यांच्या आत शिखर पूर्ण होणार

साडेतीन शक्‍तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे शिखर अधिकाधिक सहा महिन्यांच्या आत पूर्ण होईल असा विश्वास पुरातत्व विभागाने व्यक्त केला आहे. सध्याच्या अहवालावरून मंदिराच्या भिंती काढण्याची आवश्यकता भासत नाही. मात्र काम करताना त्याकडे बारकाईने लक्ष ठेवले जाईल आणि आवश्यकता भासल्यासच भिंती काढल्या जातील असेही पुरातत्व विभागाने म्हटले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

तुळजाभवानी मातेचे शिखर सोन्याने मढविण्यात येणार आहे. देशातील सुवर्ण मंदिर, अक्षरधाम मंदिर, तिरुपती मंदिर, शिर्डीचे साई मंदिर आदी मंदिरांची शिखरे सोन्याने मढलेली आहेत. त्याच धरतीवर हा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक, स्थानिक व्यापारी आणि पुजारी बांधव आशा सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असणार आहे. याबाबत कोणाला काही सुचवावे वाटत असेल अथवा काही शंका असतील तर त्यांनी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे लिखित स्वरूपात आपले म्हणणे सादर करावे असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

Story img Loader