अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारतो असं म्हणत आमदार रवी राणा यांनी आज पत्रकार परिषद घेत पराभवाच विश्लेषण करणार असल्याचं सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी प्रहारचे नेते, आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले. “बच्चू कडू हे वसुलीबाज असून त्यांना नवनीत राणा यांच्या पराभवासाठी मातोश्रीवरून रसद पुरवण्यात आली”, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला. तसेच येत्या काळात जनता सर्वांचा हिशोब करणार असल्याचा इशाराही रवी राणा यांनी दिला.
रवी राणा काय म्हणाले?
“निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केल्यानंतर त्यांचं डिपॉझिट जप्त होतं. पण फक्त खेळी करायची की कोणाचा पराभव करण्यासाठी कोणाला ब्लॅकमेल करता येईल का? मात्र, याचा हिशोब जनता नक्की करेन. वेळोवेळी कसं ब्लॅकमेल केलं? याचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. नवनीत राणा यांच्या पराभवासाठी आणि अमरावतीत उमेदवार देण्यासाठी बच्चू कडू यांना मातोश्रीतून रसद पुरवण्यात आली. ते (बच्चू कडू) महाराष्ट्रात वसुलीबाज म्हणून ओळखले जातात. ते खोक्याच राजकारण नेहमी करत आले आहेत”, असा आरोप रवी राणा यांनी केला.
हेही वाचा : “४ जून रोजी अमोल कीर्तिकर जिंकले होते, यापुढची लढाई आम्ही..”, आदित्य ठाकरेंची गर्जना
ते पुढं म्हणाले, “नवनीत राणा यांच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. मात्र, ज्या लोकांनी राजकीय पोळ्या भाजल्या आहेत. हे सर्व अमरावती जिल्ह्यातील जनतेच्या समोर आहे. नवनीत राणा यांनी ज्या पद्धतीने संसदेत काम केलं. त्यामध्ये त्यांनी अमरावतीसाठी मोठ्या प्रमाणात विकासाची काम केली. पण हे काहींच्या पोटात दुखलं. काही नेत्यांनी राजकीय पोळी भाजून घेतली. अमरावतीत राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंची सभा झाली. नवणीत राणा यांचा पराभव व्हावा, यासाठी अनेक नेते एकत्र आले. अशा पद्धतीचं चित्र निवडणुकीत दिसलं”, असं रवी राणा म्हणाले.
“देशात नरेंद्र मोदी यांना थांबवण्यासाठी जे झालं तसंच चित्र नवणीत राणा यांना थांबवण्यासाठी दिसलं. महाविकास आघाडीने खोटा प्रचार केला. त्यांच्या या प्रचाराला काही लोक बळी पडले. त्यामुळे अमरावतीच्या विकासाचं नुकसान झालं. अमरावती जिल्ह्याचा एक मोठा चेहरा थांबला. आम्ही निवडणुकीत हरलो असलो तरी देशात जिंकलो आहोत”, असंही रवी राणा यावेळी म्हणाले.
जनता हिशोब करणार
“दोन महिन्यात सर्वांचा हिशोब जनता करणार आहे. रवी राणांचा नंबर असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं. पण मला जनतेने इथपर्यंत आणलं आहे. त्यामुळे जनता जेव्हा सांगेल तुम्ही थांबा तेव्हा मी थांबेल. मात्र, मला थांबवण्याचा दम कोणत्याही नेत्यामध्ये नाही”, असा अप्रत्यक्ष इशारा राणा यांनी यावेळी दिला.