Ravi Rana On Uddhav Thackeray : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. निवडणुकीत आलेल्या अपयानंतर महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी विविध विकास कामांच्या मुद्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच राजकारणात काही मोठ्या घडमोडी घडणार का? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.
त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केला आहे. “उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती सुरु आहे”, असं मोठं विधान रवी राणा यांनी केलं. तसेच उद्धव ठाकरे हे लवकरच देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारतील असंही रवी राणा यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
रवी राणा काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष भाजपा लवकरच फोडेल असं विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाच्या संदर्भात बोलताना रवी राणा यांनी म्हटलं की, “संजय राऊत यांना कल्पना नाही. याआधीही ते अंधारात होते आणि आताही ते अंधारात आहेत. कारण आता उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर छुपी रणनीती सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे स्वीकारतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व देखील उद्धव ठाकरे स्वीकारतील. त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे पावलं टाकत आहेत. त्यामुळे संजय राऊतांनाच अचानक मोठा धक्का बसेल आणि उद्धव ठाकरे देखील भाजपाबरोबर दिसतील”, असा मोठा दावा रवी राणा यांनी केला आहे.
रवी राणा पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता दोन पावलं मागे येऊन मुख्यमंत्री पद सोडून उपमुख्यमंत्री पद स्वीकारतात, तर आज भाजपाचं बहुमत आहे एकहाती सत्ता आहे हे लक्षात ठेवून एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना ती संधी दिली. एकनाथ शिंदे यांनीही दोन पावलं मागे घेतले, यालाच राजकारण म्हणतात. वेळेनुसार दुसऱ्यांना संधी द्यावी लागते. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. त्यामुळे संजय राऊत यांनी काहीही टीका करू नये”, असं म्हणत रवी राणा यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.