शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचं वाटप केल असून चिन्हही दिलं आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळालं असून, ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावासाठी मान्यता देण्यात आली आहे. यानंतर आमदार रवी राणा यांना उद्धव ठाकरेंनी लक्ष्य केलं असून टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ही ‘उद्धव बाळासाहेब सेना’ नव्हे तर ‘उद्धव काँग्रेस सेना’ आहे”, असं रवी राणा म्हणाले आहेत. तसंच एकनाथ शिंदेंचींच ‘खरी शिवसेना’ असल्याचंही म्हटलं आहे. “उद्धव ठाकरे यांची सेना ही काँग्रेसच्या विचाराची सेना आहे. काँग्रेसच्या विचारांची सेना असल्याने त्यात पहिलं नाव उद्धव ठाकरेंचं आहे. एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने न्याय दिला असून, त्यांचीच खरी शिवसेना आहे,” असं त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले “बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा एकनाथ शिंदेंकडे आहे. येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिका व पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे व भाजपाची एकहाती सत्ता येईल”.

निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, कोर्टाबाहेरुन म्हणाले “भविष्यात…”

ठाकरे गटाच्या पक्षाच्या नावाासठी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ असे तीन पर्याय आयोगापुढे सादर करण्यात आले होते. मात्र, ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ हा पक्षनावाचा पर्याय शिंदे गटानेही दिला होता. दोन्ही गटांकडून एकाच नावाचा आग्रह धरला गेल्याने हे पक्षनाव कोणत्याही गटाला न देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आणि ठाकरे गटाच्या दुसऱ्या पर्यायाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे ठाकरे गट आता ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ या नावाने ओळखला जाईल.

ठाकरे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘धगधगती मशाल’ हे चिन्हांचे तीन पर्याय दिले होते. मात्र, हे तीनही पर्याय खुल्या यादीतील नव्हते. ‘त्रिशूळ’ या चिन्हाला धार्मिक संदर्भ असून, शिंदे गटानेही याच चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे हे चिन्ह दोन्हीही गटांना नाकारण्यात आले. ‘उगवता सूर्य’ हे ‘द्रमूक’ पक्षाचे चिन्ह असल्याने आणि या चिन्हावरही शिंदे गटाने हक्क सांगितल्याने हे चिन्हही रद्द झाले. ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह खुल्या यादीतील नसले तरी, आता ते खुले करण्यात आले आहे. हे चिन्ह २००४ मध्ये ‘समता पक्षा’ला देण्यात आले होते.

ठाकरे गटाला मशाल ! ; आयोगाकडून ‘शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावास मान्यता

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाला वापरता येईल. शिंदे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ तसेच, ‘गदा’ या चिन्हांचा पर्याय दिला होता. मात्र, ‘गदा’ या चिन्हालाही धार्मिक संदर्भ असल्याने आयोगाने हे चिन्ह नाकारले. धार्मिक संदर्भ असलेली चिन्हे राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे म्हणून न देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी, दुपारी एक वाजेपर्यंत पक्ष व चिन्हांचे तीन पर्याय सादर करण्यास सांगितले होते. मात्र, दोन्ही गटांकडून सादर झालेल्या नाव आणि चिन्हांमध्ये साधर्म्य असल्याचंही उघड झालं. त्यामुळे आयोगाकडून कोणता निर्णय घेतला जाईल, याकडे लक्ष लागले होते. अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक चिन्हाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी शिंदे गटाने केली होती. त्यावर, शनिवारी रात्री उशिरा केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे मूळ नाव व ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्हही गोठवण्याचा हंगामी निर्णय घेतला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla ravi rana on uddhav thackeray eknath shinde shivsena election commision sgy
Show comments