गेल्या काही महिन्यांपासून मुंबईच्या जोगेश्वरीतील आमदार रवींद्र वायकर यांच्यावरील ईडी चौकशीची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत होती. त्यावरून बरेच आरोप-प्रत्यारोपही झाले होते. खुद्द रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर परखड शब्दांत टीका केली होती. मात्र, रविवारी रात्री रवींद्र वायकर यांनी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे यावरून मोठ्या राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. त्यातही रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या उत्तरांवरून तर्क-वितर्कांना ऊत आला आहे.
जोगेश्वरीतील पालिकेच्या ताब्यातील एका भूखंडाचं प्रकरण व एका पंचतारांकित हॉटेलच्या मुद्द्यावरून रवींद्र वायकर यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला होता. खुद्द वायकर व त्यांच्या पत्नीला यामध्ये आरोपी करण्यात आलं होतं. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी तर वायकर पती-पत्नीला अटक होणार असाही दावा केला होता. मात्र, मुंबई पालिकेनं अचानक रवींद्र वायकर यांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि पडद्यामागच्या घडामोडींची चर्चा होऊ लागली. अखेर रविवारी रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
रवींद्र वायकरांची सारवासारव?
पक्षप्रवेशानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रवींद्र वायकर यांना माध्यम प्रतिनिधींनी विकासकामांसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांना पुरेसा निधी दिला जात नसल्यामुळेच विरोधी पक्षांमधील आमदार सत्तेत सामील होत आहेत का? असा प्रश्न विचारताच त्यावर रवींद्र वायकरांनी थेट उत्तर देणं टाळल्याचं दिसून आलं. “विकासनिधीच्या असमान वाटपाविरोधात मी न्यायालयातही गेलो होतो. पण तिथे काय निर्णय झाला हे सगळ्यांना माहिती आहेच. निधी मिळायलाच हवा. सत्तेत असणाऱ्याला जास्तच मिळतं”, असं रवींद्र वायकर यावेळी म्हणाले.
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रविंद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला १७३ कोटी…”
यावेळी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूला बसले होते. त्यावर एकनाथ शिंदेंनी मिश्किल टिप्पणी करतचा उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.
ईडी चौकशीचं काय?
दरम्यान, खुद्द रवींद्र वायकर यांनीही आपण फक्त मतदारसंघांमधली विकासकामं करून घेण्यासाठी सत्तेत जात असल्याचा दावा केला असला, तरी ईडीच्या चौकशांपासून वाचण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. यावर वायकर यांनी त्यांची बाजू मांडली. “सर्व यंत्रणा व चौकशीला मी सामोरा गेलो आहे. त्यांना सर्व सहकार्य दिलं आहे. त्यामुळे अशा ज्या यंत्रणा असतील, त्यांना सहकार्य दिलं तर सत्य काय ते समोर येतं”, असं ते म्हणाले.