सातारा लोकसभेच्या जागेची सध्या चांगलीच चर्चा चालू आहे. या जागेवरून उदयनराजे भोसले हे निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ते नेमकं कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार यावरून अनेक तर्कवितर्क लावले जातायत. यावरच आता राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. साताऱ्यात तुतारी आणि भाजपा यांच्यात लढत होईल, असं वाटतंय, असं रोहित पवार म्हणाले. ते आज विधिमंडळ परिसरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
रोहित पवार काय म्हणाले?
“उदयनराजे भोसले हे घड्याळ या चिन्हावरून निवडणूक लढायला तयार असतील तर वेगळी स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र आगामी काही दिवसांत ते भाजपाकडून निवडणूक लढवतील की अजित पवार गटाकडून हे स्पष्ट होईल. मात्र आमच्या अनुभवानुसार उदयनराजे हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्ष विरुद्ध भाजपा अशीच लढत होण्याची शक्यता आहे,” असे रोहित पवार म्हणाले.
उदयनराजेंची भूमिका काय?
दरम्यान याआधी उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणूक आणि त्यांची ही निवडणूक लढवण्याची शक्यता यावर भाष्य केले होते. यावेळी बोलताना मी भाजपाकडूनच निवडणूक लढवणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते. लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्याला मी अपवाद नाही. पक्षाने तिकीट दिल्यास मी पण उभा राहीन. सर्वांच्या नसा-नसात शिवाजी महाराज आहेत. महाराजांचे जे विचार होते त्याच विचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशात काम करत आहे. लोककल्याणाचा विचार महाराजांचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले.
२०१९ सालच्या निवडणुकीत काय झालं होतं?
उदयनराजे भोसले यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अविभाजित) तिकीटावर साताऱ्याची लोकसभा निवडणूक जिंकली होती. परंतु, निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसांनी त्यांनी खासदारकीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच भोसले यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. उदयनराजे भोसले यांनी भाजपाच्या तिकीटावर ही निवडणूक लढवली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीनिवास पाटील यांना साताऱ्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. परंतु, या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केला. त्यानंतर भाजपाने उदयनराजे यांना राज्यसभेवर पाठवलं.