कर्जत : कर्जत नगरपंचायतमधील सत्तासंघर्षात आमदार रोहित पवार यांना पुन्हा झटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अमृत काळदाते यांचा गटनेतेपदाचा अर्ज बहुमताच्या आधारावर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी फेटाळला. त्यामुळे बंडखोर संतोष मेहेत्रे गटनेतेपदी कायम राहिले आहेत. कर्जत नगरपंचायतमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. नगराध्यक्ष निवडीसाठी दि. २ मे रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी (दि. २८) सकाळी ११ ते २ या वेळेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. यानंतर अर्जाची छाननी, माघार व दि. २ मे या दिवशी नगराध्यक्ष निवडी होणार आहे. नवीन नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नूतन नगराध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नवीन नगराध्यक्ष निवडीत गटनेत्यास महत्त्व आहे. राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नगरसेवकात फूट पडून १२ पैकी ८ नगरसेवकांनी पक्षाच्याच नगराध्यक्षविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यात गटनेते संतोष मेहेत्रे व उपगट नेते सतीश पाटील यांचाही समावेश आहे.
राष्ट्रवादीने अमृत काळदाते यांची गटनेते व प्रतिभा भैलुमे यांची उपगट नेते म्हणून दि. २६ मार्चच्या सभेत निवड केली. त्यास राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सर्व १५ नगरसेवकांच्या सहीने निवड केली, त्याची नोंद जिल्हाधिकाऱ्यानी अभिलेखावर घ्यावी तसेच या बैठकीस १५ जण उपस्थित असताना ते ही बाब नाकारत आहेत, त्यांची पुरावा व साक्ष कायद्यान्वये निर्णय घेण्याबाबत अमृत काळदाते यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी मागणी केली होती. दि. २५ एप्रिलला गटनेते पदासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. त्यावेळी दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या गटनेते, उपगटनेते नोंदणीची पडताळणी झाली नाही, या प्राधिकरणास पडताळणीचे अधिकार नाहीत. असा आक्षेप काळदाते यांनी घेतला तसेच २६ मार्च २०२५ रोजी गटनेता व उपनेते बदलण्याबाबत सभा झाली त्यावर सर्व १५ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. असे उषा राऊत व इतर तीन सदस्यांनी उपस्थित राहून सांगितले तसेच नगरसेवकांच्या सह्या तज्ज्ञामार्फत तपासणीची मागणी केली.
या मागणीला रोहिणी सचिन घुले व इतर १० सदस्यांनी आक्षेप घेत दि. २६ मार्चला गटनेते व उपगटनेते बदलण्याची सभा झाली नाही, कागदपत्रांतील सह्या त्यांच्या नाहीत. नगरसेविका लंकाबाई खरात यांचा या अर्जावर अंगठा आहे, मात्र सद्य:स्थितीत त्या आता स्वाक्षरी करतात असे निदर्शनास आणले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी, ११ नगरसेवक गटनेता व उपगटनेता बदलाची सभा झाली नाही असे सांगणारे तर ४ जण सभा झाल्याचे सांगत आहेत, असे नमूद करत अमृत काळदाते यांचा अर्ज नामंजूर केला.
गटनेता म्हणून आपण कायम असून, उपनेते म्हणून सतीश पाटील हे कायम आहे. यामुळे नगराध्यक्ष निवडीवेळी माझाच ‘व्हिप’ राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या सर्व १५ नगरसेवकांना ग्राह्य धरला जाणार आहे. संतोष मेहेत्रे, गटनेता