Sunanda Pawar Statement: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (दि. १२ डिसेंबर) शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत असताना आता आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी मोठे विधान केले आहे. कालच्या काका-पुतण्याच्या भेटीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “कालची भेट कौटुंबिक होती. शरद पवार ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व लोक आले होते. दरवर्षी आम्ही सर्व कुटुंबिय शरद पवारांना भेटत असतो. आता कुटुंब म्हणून एकत्र येण्याची गरज आहे.”
मूठ घट्ट असेल तर त्याची ताकद राहते
अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येतील याबाबत काही सांगता येणार नाही. सगळ्याच कुटुंबांमध्ये मतभेद असतातच. मतभेद मिटतील. भविष्यात हे एकत्र येऊ शकतात. त्यांनी एकत्र यायला पाहिजे असे मला वाटते, असेही सुनंदा पवार म्हणाल्या. “मूठ घट्ट असेल, तर त्याची ताकद राहते. आपण विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते. पण कुणी कुणासोबत जायला हवे हा निर्णय त्या दोघांनी घ्यायला हवा, असेही त्या म्हणाल्या.
शरद पवार सत्तेत जाणार का?
शरद पवार यांनीही आता सत्तेत जायला हवे का? असाही प्रश्न सुनंदा पवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, “शरद पवार यांनी ६० वर्ष राजकारणात काढले आहेत. हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे. त्यामुळे त्यांनी काय करावे किंवा करू नये, हे मी नाही सांगू शकत.”
रोहित पवारांना पक्षात संधी मिळायला हवी का? असा प्रश्न विचारला असता सुनंदा पवार म्हणाल्या की, फक्त रोहित पवारच नाही तर इतरही जे तरूण नेते पक्षात आहेत, त्यांना संघटनेच्या कामाची जबाबदारी द्यायला हवी. यामुळे पक्ष आणखी चांगल्या पद्धतीने उभा राहू शकतो. रोहितसह आणखीही तरूण आमदार निवडून आले आहेत. या नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला हवी, असेही त्या म्हणाल्या.
अजित पवार गटाकडूनही आली प्रतिक्रिया
सुनंदा पवार यांच्या प्रतिक्रियेला अजित पवार गटाकडून लगेच उत्तर मिळाले आहे. विधानपरिषेदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “सुनंदा पवार यांची प्रतिक्रिया स्वागतार्ह आहे. पण त्यासाठी थोडा उशीरच झाला. षण्मुखानंद येथे झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी हीच भूमिका काही काळापूर्वी मांडली होती. आता या प्रतिक्रिया येणे स्वाभाविकच आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात ४१ आमदार निवडून आले आहेत. एक लोकसभा तर दोन राज्यसभेचे खासदार आहेत. अशावेळेस ‘देर आये पर दुरूस्त आये’ असे म्हणून त्यांना एकत्र यायचे असेल तर त्यांनी अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करून एकत्र यावे.”