Rohit Pawar On Devendra Fadnavis : महायुती सरकामधील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. मात्र, यानंतर सदर महिलेला खंडणीच्या आरोपाप्रकरणी पोलिसांनी अटक केलं. या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली. मात्र, माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी एक गंभीर आरोप केला.
सदर आरोपी महिला आणि तिच्याबरोबर असलेले काही सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या संपर्कात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर आता आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ‘सदर महिलेच्या न्यायासाठी एक ते दोन फोन झाले असतील. पण हा विषय पारदर्शकपणे हाताळाला गेला पाहिजे’, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
“काही वेळापूर्वी एका विषयाच्यासंदर्भात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझं (रोहित पवार) नाव घेतलं, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचं देखील नाव घेतलं. तो विषय आमच्याकडे आला, आम्हाला सांगण्यात आलं की त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे. तसेच पत्रकारालाही न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही एक किंवा दोन फोन केले असतील. पण शंभर ते दोनशे फोन केले गेले नाहीत. आता तेथे कारवाई सुरू आहे. पण हा विषय फक्त पारदर्शकपणे हाताळायला हवा, जे खरं आहे ते लोकांसमोर यावं”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
मंत्री गोरेंच्या हक्कभंग प्रस्तावर रोहित पवारांचं निवेदन
मंत्री जयकुमार गोरे यांनी मांडलेल्या हक्कभंग प्रस्तावर आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. यावेळी रोहित पवार म्हणाले की, “विधानसभेत एका व्यक्तीने हक्कभंग मांडत असताना चुकीची माहिती सभागृहाला दिली. हे चुकीचं असल्याचं आम्हाला आज सांगायचं आहे. हे सांगण्याचा आम्हाला अधिकार आहे. एखाद्या महिलेवरील अत्याचाराचा विषय तुमच्यापर्यंत आला असता तर तुम्ही देखील त्यावर बोलले असते. आता मला सभागृहात आणखी एक विषय मांडायचा आहे. एक मांतग समाजाचा व्यक्ती आहे. ते स्वत: च्या हक्कासाठी लढत आहेत. भिसे नावाचं ते कुटुंब आहे. त्यांच्या वडिलांचं नाव वापरून जमीन हडपण्यात आली. अशा प्रकारे गरिबांची जमीन हडपली जात असेल अशा गोष्टींवर आम्हाला बोलायचं असेल आणि जर आम्हाला बोलू दिलं जात नसेल तर त्या कुटुंबाला न्याय कधी मिळणार?”, असा सवाल रोहित पवारांनी केला.
“एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे पुरावे आहेत. जी कारवाई तुम्ही आमच्यावर करता किंवा ज्या प्रमाणे तु्म्ही चौकशी करत आहात, पण हे गरिबाचे विषय आहेत. ते देखील एका मंत्र्याच्या विरोधातील. याबाबत कोणी बोलणार आहे का? याची तुम्ही चौकशी करणार आहात का? जर खऱ्या अर्थाने या विषयांवर चौकशी झाली तरच या सभागृहात संविधान जिवंत आहे असं आम्ही समजू. पण फक्त आम्ही विरोधात आहेत म्हणून आमच्यावर कारवाई आणि जे सत्तेत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात नसेल तर हे योग्य नाही”, असंही रोहित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी काय आरोप केले होते?
देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत निवेदन सादर करताना म्हटलं होतं की, “हे एक प्रकारचं नेक्सस होतं. या प्रकरणातील तिघा आरोपींना अटक झाली. एक स्वत: ती महिला आहे. दुसरा हा पत्रकार तुषार खरात आहे आणि तिसरा अनिल सुभेदार नावाचा व्यक्ती. या सगळ्यांनी मिळून हा कट रचला होता. याचे सगळे पुरावे सापडले आहेत. यांचं व्हॉट्सअॅप संभाषण सापडलं. यांचे १५० फोन सापडले आहेत. यांनी कट कसा रचला हे समोर आलं. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यात थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात”, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला.
“प्रभाकर देशमुख यात थेट १०० वेळा या तिन्ही आरोपींशी बोलले आहेत. व्हिडीओ त्यांच्याकडे गेले आहेत. त्यांचंही उत्तर आलं आहे. पण त्याहीपेक्षा मला वाईट वाटतं ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात यांना झाले आहेत याचं. जयकुमार गोरेंचे जे व्हिडीओ झालेत, ते आरोपींनी या दोघांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होईल. पण हे चाललंय काय? आपण राजकीय शत्रू नाही आहोत, आपण राजकीय विरोधक आहोत. अशा प्रकारे कुणाला जीवनातूनच उठवण्याचा कट रचला जात असेल तर हे चुकीचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.