Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरण तब्बल पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या माध्यमातून दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच दिशा सालियनची हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला आहे. यावरून आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलं आहे. “आजपासून पुढे काही दिवस भाजपाकडून अशा पद्धतीचं राजकारण केलं जाईल. भाजपा जेव्हा असं राजकारण करतं तेव्हा त्याच्यामागे काहीतरी हेतू असतो”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. ‘तसेच दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या विषयाशी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही’, असा दावाही रोहित पवार यांनी केला आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
रोहित पवार काय म्हणाले?
“दिशा सालियन मृत्यू प्रकरणात दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात चार वर्षांनंतर धाव घेतली असेल, हरकत नाही, न्यायालयात कोणीही न्याय मागू शकतं. न्यायालय जो निर्णय देईल तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. मात्र, या संपूर्ण प्रकरणाबाबत आमचं असं मत आहे की आदित्य ठाकरे यांचा या विषयाशी काहीही संबंध नाही. पण याचं भाजपाकडून राजकारण केलं जात आहे”, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
“सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण जेव्हा समोर आलं होतं, तेव्हा बिहारच्या निवडणुका होत्या. तेव्हा अशा पद्धतीने राजकारण केलं गेलं. बिहारच्या निवडणुका झाल्यानंतर सर्वजण सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणाला विसरून गेले. चार वर्ष झाले पण कोणीही सुशांतचं नाव काढलं नाही. आता एक वर्षांनंतर पुन्हा बिहारच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुशांत सिंह राजपूत प्रकरण फक्त राजकारणासाठी जिंवत केलं जाईल”, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
“दिशा सालियन मृत्यू प्रकरण भाजपा ज्या पद्धतीने हाताळेल, त्यामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीचं राजकारण केलं जाईल. भाजपाला फक्त कोणत्या न कोणत्या मुद्यांवरून राजकारण पाहिजे. दिशा सालियन प्रकरणाच्या माध्यमातून आपण निवडणुकीत मुद्दा करू शकतो का? मुंबईच्या महापालिका निवडणुकीत आदित्य ठाकरेंना अडचणीत आणू शकतो का? काही प्रमाणात हो, फक्त वातावरण निर्मीतीसाठी, त्यामुळे भाजपाला वाटत असेल की दिशा सालियन प्रकरण फायद्याच्या दृष्टीकोणातून चांगलं दिसतंय, त्यामुळे आता आजपासून भाजपा कोणत्या पद्धतीचं राजकारण करतं हे तुम्ही पाहा”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.