Rohit Pawar : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या संघटनेत मोठे फेरबदल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे लवकरच भाकरी फिरवणार असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मुंबईत बैठक पार पडली होती. या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी पक्षात फेरबदल करण्याची मागणी केली होती. कार्यकर्त्यांनी केलेल्या या मागणीची मोठी चर्चा देखील रंगली होती. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात मोठं भाष्य केलं आहे. ‘आमच्या पक्षात देखील फेरबदल होतील असे संकेत शरद पवार यांनी दिलेले आहेत’, असं रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
“सर्वच पक्षात बदल होत असतात आणि झालेही पाहिजेत. मग जे सत्तेत आहेत त्यांच्या पक्षात बदल करायचा किंवा नाही? तो त्यांचा विषय आहे. मात्र, आमच्या पक्षाबाबत शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. त्यामध्ये जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख हे देखील बैठकीला होते. त्या बैठकीत आमच्या पक्षात देखील फेरबदल होतील, असे निर्देश किंवा तसे एक संकेत शरद पवार यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आमच्या पक्षात देखील काय होतंय? ते येत्या काळात पाहावं लागेल. प्रत्येक पक्षात बदल झाले पाहिजेत आणि बदल होत असतात. त्यामुळे आता काय बदल होतात ते पाहावं लागेल”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
बैठकीत नेमकं काय घडलं होतं?
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची काही दिवसांपूर्वी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशाची कारणे काय? यावर विचारमंथन करण्यात आलं होतं. तसेच आता आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले होते. दरम्यान, याच बैठकीत पक्षाच्या एका कार्यकर्त्याने शरद पवार यांच्याकडे पक्षाच्या संघटनेत फेरबदल करण्याची मागणी केली होती. जिल्हा पातळीपासून ते थेट प्रदेशाध्यक्षांपर्यंत सर्वांचे राजीनामे घ्या आणि पुन्हा निवड करून नव्या चेहऱ्यांना संधी द्या, अशी मागणी कार्यकर्त्याने केली होती. त्यानंतर शरद पवार पक्ष संघटनेत भाकरी फिरवणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, आता आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा बोलताना पक्षाच्या संघटनेत बदल होतील असं सूचक विधान केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.