Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हे त्यांच्या पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याचं कारण म्हणजे छावा चित्रपटाच्या संदर्भात काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही सूचक भाष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे रोहित पवारांना नेमकं काय म्हणायचंय? असे सवाल उपस्थित करण्यात आले. यानंतर आज रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आणि महाराष्ट्रातील विविध विषयांवर भाष्य केलं. याचवेळी रोहित पवारांना नाराजीच्या संदर्भाने काही प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी पुन्हा एकदा पक्षातील काही नेत्यांबाबत सूचक भाष्य केलं. ‘मी कुठेतरी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटत असावं’, असं सूचक विधान केलं. त्यामुळे रोहित पवारांच्या या विधानाचा रोख कोणाकडे आहे? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.
रोहित पवार काय म्हणाले?
तुमच्या पक्षाची एक महत्वाची बैठक झाली, त्या बैठकीत अनेकांना वेगवेगळ्या पदाचं वाटप करण्यात आलं. पण जे रोहित पवार निवडणुकीत मैदानात उतरून लढाई लढत होते, ते यामध्ये कुठेही दिसत नाहीत? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी रोहित पवारांना विचारला, यावर बोलताना ते म्हणाले, “मी आजारी असल्यामुळे मला त्या बैठकीला जाता आलं नाही. त्यामुळे त्या बैठकीत काय चर्चा झाली हे मला सांगता येणार नाही. मात्र, अजूनपर्यंत कुठलीही जबाबदारी माझ्यापर्यंत आलेली नाही. तसेच मला कोणती जबाबदारी दिलेली आहे हे मला कळालेलं नाही. मला जबाबदारी दिली नाही म्हणून मी नाराज आहे असा विषय नाही”, असं रोहित पवार यांनी म्हटलं.
‘मी कुठेतरी कमी पडतोय…’
“माझं म्हणणं एकच आहे की आज लढण्याचे दिवस आहेत, त्यामुळे लढलं पाहिजे. आता राहिला प्रश्न की गेले ७ वर्ष पक्षाच्यावतीने मी लढत असताना मी कुठेतरी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटत असावं त्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला असावा. तसेच काही महत्वाचा निर्णय उद्या घ्यायचा असेल तेव्हा तो निर्णय घेतला जाईल. पण त्या बैठकीत काय चर्चा झाली हे मला सांगता येणार नाही. मी तुम्हाला एवढंच सांगतो की, मी एक आमदार म्हणून पक्षाचा पाठिंबा असला काय आणि नसला काय? पण सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी मी लढत आलो आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मला शरद पवारांचा पाठिंबा राहिलेला आहे. त्यांचा पाठिंबाच माझ्यासाठी सर्वकाही आहे”, असं रोहित पवार यांनी म्हटलं.
‘मीच नाही संपूर्ण महाराष्ट्र नाराज…’
“आता मी कोणाच्या बाबतीत व्यक्तिगत बोलणार नाही. पण प्रश्न राहिला नाराजीचा, तर मीच नाही संपूर्ण महाराष्ट्र नाराज आहे. महाराष्ट्र सरकारवर आणि विरोधी पक्षावरही नाराज आहे. सरकारवर का? तर सरकार लोकांचे प्रश्न सोडवत नाही. तसेच विरोधीपक्ष का? तर विरोधी पक्ष लोकांचा आवाज बनवून लढत नाही. मी विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना विनंती करतो की, यामध्ये अनेक अनुभवी नेते आहेत, अनेकवेळा मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत. पण आज या सरकारच्या विरोधात बोलताना दिसत नाहीत. आज लढण्याचे दिवस आहेत. शांत बसण्याचे दिवस नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र नाराज आहे आणि मी देखील नाराज आहे”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.