राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपल्याला अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे, असे विधान एका जाहीर सभेत केले आहे. निलेश लंके यांच्या या विधानानंतर राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. सध्या राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच ठाकरे गटाची महाविकास आघाडीच्या माध्यमातून युती आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण? असा प्रश्न नव्याने विचारला जात आहे. निलेश लंके यांनी केलेले विधान ताजे असतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यात मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची क्षमता आहे, असे विधान केले आहे. ते आज (११ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>> “…तर माझ्यासमोर मोदी फार मोठी गोष्ट नाही” प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान; मांडलं विजयाचं नेमकं गणित, थेट आकडेवारीच दिली!
अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आणि ताकद आहे
“आपली एखाद्या पक्षाची युती असेल आणी कोणाला मुख्यमंत्रीपदासाठी नेता निवडायचा असेल तर आपल्यासोबत असलेल्या पक्षांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जातो. मला व्यक्तिगत विचारलं तर अजित पवार यांच्यात मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची क्षमता आहे. उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे. या पदासाठी अनेक नेते आहेत. मात्र मी अजित पवार यांना खूप जवळून पाहिलेले आहे. सर्व पक्षांनी तसेच आमच्या पक्षप्रमुखांनी ठरवले तर अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आणि ताकद आहे,” असे रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा >>> “मी त्यांच्या बापाला..,” ‘त्या’ प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचं महाविकास आघाडीवर टीकास्त्र!
आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचंय- निलेश लंके
निलेश लंके यांनी आपल्याला अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे, असे जाहीर विधान काही दिवसांपूर्वी केले आहे. तसेच कार्यकर्त्यांनी त्यासाठी कामाला लागवे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. “आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचंय. फक्त व्यासपीठावर बोलण्यापेक्षा दादांची काम करण्याची पद्धत घराघरात पोहोचवण्याचं काम येत्या वर्षभरात करायचं आहे. पुढच्या वर्षी आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. त्यामुळे राज्यातला विकासाचा थांबलेला गाडा घराघरांत पोहोचवणं गरजेचं आहे. मी तर बऱ्याच भाषणांत सांगतो, की अजित पवारांना फक्त पाच वर्षं मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर आपलं राज्य २५ वर्षं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आहे”, असं आमदार निलेश लंके म्हणाले आहेत.