राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीटद्वारे माहिती दिली आहे.
रोहित पवार यांनी म्हटले आहे की “राज्यात सध्या अतिवृष्टीने मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचा खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती सर्वत्र आहे. अशा स्थितीत शासनाकडून मिळणारी मदत आणि पिकविम्याचे संरक्षण याकडे शेतकरी आस लावून आहेत.”
याचबरोबर “पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यात ९६.६१ लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून सततच्या पावसाच्या नुकसानीमुळे ४९ लाख शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मागितली. परंतु विमा कंपन्यांनी अद्याप केवळ ५.५ लाख अर्जच निकाली काढले आहेत. विविध तांत्रिक कारणं देऊन या कंपन्या शेतकऱ्यांचे दावे फेटाळत आहेत.” असं त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे.
याशिवाय, “एकट्या नगर जिल्ह्यात शेतकरी आणि सरकारने हप्त्यापोटी ८१कोटी रुपये भरले पण या कंपन्यांनी केवळ ९ कोटींची भरपाई दिली. विमा कंपन्यांचं हे धोरण नफेखोरीचं असून याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळण्याबाबत लक्ष घालण्याची विनंती मुख्यमंत्री महोदयांना केली.” असल्याची माहिती रोहित पवारांनी दिली आहे.