खासदार आणि आमदारांच्या वेतनाबद्दल नेहमीच चर्चा होत असते. खासदार-आमदारांना मिळणारे वेतन व भत्ते हे जास्त असल्याचा सामान्य नागरिकांचा आक्षेप असतो. त्याच वेळी लोकप्रतिनिधींना मात्र हे वेतन व भत्ते कमीच वाटतात. प्रत्येक अधिवेशनात किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांकडून भत्ते आणि आमदार निधीत वाढ करण्याची मागणी केली जाते. राज्यात सध्या मिळणारे वेतन व भत्ते हे ऑगस्ट २०१६ पासून लागू झाले आहेत. पुढील सोमवारपासून सुरू होणारे विद्यमान विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य सरकारमधील प्रधान सचिवाला अनुज्ञेय असलेले वेतन व भत्ते आमदारांना देण्याची तरतूद आहे. अर्थात प्रधान सचिवाला सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणाऱ्या वेतन व भत्त्यांनुसार सदस्यांना तेवढी रक्कम दिली जाते. केंद्रात व राज्यात सातवा वेतन आयोग लागू झाल्याने प्रधान सचिवांच्या वेतन व भत्त्यांमध्ये वाढ झाली असणार. नव्याने निवडून येणाऱ्या आमदारांकडून वेतन व भत्त्यांमध्ये वाढ करण्याची मागणी होऊ शकते.

राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना दरमहा १ लाख ८३ हजार ४४० रुपये एवढे वेतन व भत्ते मिळतात. याशिवाय आणखी काही सोयीसुविधा मिळतात. दरमहा दोन लाखांपेक्षा जास्त वेतन, भत्ते व अन्य सुविधांच्या माध्यमातून आमदारांना मिळत असतात.

आमदारांचे वेतन, भत्ते व अन्य सुविधा यांची संक्षिप्त माहिती

  • मूळ वेतन – ६७ हजार
  • महागाई भत्ता – ८८,४४० (मूळ वेतनाच्या १३२ टक्के)
  • दूरध्वनी भत्ता – आठ हजार
  • स्टेशनरी व टपाल भत्ता – १० हजार
  • संगणक चालकाचा भत्ता – १० हजार
  • दरमहा वेतन व भत्ते – १ लाख, ८३ हजार, ४४० रुपये

अन्य भत्ते व सुविधा

  • दैनिक भत्ता – दोन हजार रुपये (अधिवेशन कालावधी आणि समितीच्या बैठका. समितीच्या बैठका दरमहा किमान चार तरी होतात)
  • स्वीय सहाय्यकाचा भत्ता – २५ हजार
  • दूरध्वनी – निवासस्थानी बसविलेल्या दूरध्वनीचे दरमहाचे देयक खर्च
  • रेल्वे प्रवास – राज्यांतर्गत मोफत, राज्याबाहेर ३० हजार किमी पर्यंत
  • एस टी प्रवास – राज्यात सर्वत्र मोफत प्रवास. आमदारांची पत्नी किंवा पतीलाही मोफत
  • बोटीचा प्रवास – मोफत
  • विमान प्रवास – राज्यांतर्गत ३२ वेळा एकेरी प्रवास मोफत , राज्याबाहेर वर्षांत आठ वेळा एकेरी प्रवास
  • संगणक – प्रत्येक सदस्याला त्याच्या आमदार निधीतून एक लॅपटॉप / डेक्सटॉप, लेझर प्रिंटर
  • वाहन कर्जावर व्याज शासन फेडणार – आमदाराला पाच वर्षांच्या कालावधीत वाहन खरेदीसाठी १० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्याचा हक्क आहे. या कर्जावर दहा टक्क्य़ांपर्यंत व्याज शासनाकडून फेडले जाते.
  • आमदार निधी – मतदारसंघातील कामांसाठी दर वर्षांला दोन कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी मिळतो. या रक्कमेत वाढ करण्याची आमदारांची नेहमीची मागणी असते.
  • आरोग्य सेवा – सरकारी रुग्णालयांमध्ये आमदारांना मोफत वैद्यकीय सेवा. खासगी रुग्णालयात उपचार घेतले असल्यास औषधोपचाराकरिता ९० टक्के रक्कम. खासगी रुग्णालयातील तीन लाखांपेक्षा जास्त खर्चाचे देयक सादर केल्यास त्याची उच्चाधिकार समितीकडून छाननी.
  • निवृत्ती वेतन – पाच वर्षे आमदारकी भूषविल्यास ५० हजार रुपये निवृत्ती वेतन. पाच वर्षांपेक्षा जास्त काळ आमदारकी भूषविली असल्यास पाच वर्षांवरील प्रत्येक वर्षांसाठी दरमहा दोन हजार रुपये जास्त.
  • कुटुंब वेतन – माजी आमदाराच्या निधनानंतर त्याची पत्नी वा पतीस दरमहा ४० हजार रुपये निवृत्ती वेतन.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla salary in india