BJP MLA Sanjay Kute Unhappy with Party : जळगाव-जामोद मतदारसंघाचे भाजपाचे आमदार संजय कुटे यांना यावेळी (२०२४) मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळालेलं नाही. कुटे हे जळगाव-जामोद मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी ते जळंबचे आमदार होते. सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले संजय कुटे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. मात्र, त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते व जळगाव-जामोदमधील भाजपा पदाधिकारी नाराज आहेत. आपल्याला कूटनीति’चा फटका बसला असल्याचं कुटे यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

भाजपा आमदाराने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “नमस्कार! मी आमदार डॉ. संजय कुटे, श्रीराम कुटे गुरुजी यांचा मुलगा आहे आणि उर्मिलाताई यांच्यासारख्या प्रेम वत्सल्य असणाऱ्या मातेचा मुलगा आहे. माझ्या आई वडिलांनी माझ्यावर सुसंस्कृत संस्कार केले आहेत, माझ्या आईवडिलांनी मला शिकवले आहे, महत्त्वकांक्षा जरूर ठेवावी पण ती राक्षसी नसावी. दुसऱ्यांचा जीव घेऊन किंवा कुटनीती करून किंवा दुसऱ्यांना संपवून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका, तुमच्या कर्तृत्वाने, मेहनतीने, सेवेने, चांगले आणि प्रामाणिक काम करून तुम्ही पुढे गेलं पाहिजे. आयुष्यात आपण किती पुढे गेलं पाहिजे हे वेळ आणि काळच ठरवत असतो. याच विचारांवर जगणारा मी एक सामान्य लहान कार्यकर्ता आहे. बालपणापासून माझ्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे संस्कार झालेले आहेत. लहानपणापासून पिंगळे सरांच्या शाखेत जाणारा मी एक स्वयंसेवक आहे. त्यामुळे संघांमध्ये जी शिकवण मिळाली ती हीच आहे. त्याग, समर्पण, सेवा आणि राष्ट्रप्रथम हीच मला मिळालेली शिकवण आहे. त्यागामध्ये मी कुठे कमी पडलो असे मला वाटत नाही ज्या ज्या वेळी पक्षाने मला त्याग करायचा सांगितलं तेव्हा मी चांगल्या मनाने त्याग सुद्धा केलेला आहे”.

हे ही वाचा >> “जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”, मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळांचं सूचक वक्तव्य; तर्कवितर्कांना उधाण

आमदार कुटे म्हणाले, “आजही पक्षाने मला थांबवले याचे मला जरासुधा दुःख नाही कारण शेवटी स्वयंसेवक असल्याने एका स्वयंसेवकाला हे स्वीकारावेच लागते. समर्पनामध्ये कुठे कमी पडलो असे मला वाटत नाही तरीसुद्धा पक्षात काम करत असताना ज्या ज्या भूमिका मला पक्षाने दिल्या त्या मी प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. माझ्यामध्ये जेवढी क्षमता आणि शक्ती होती ती पक्षासाठी वापरली आहे.पण तरीसुद्धा मला स्वतःला असं वाटायला लागतं की पार्टीच्या ज्या अपेक्षा होत्या पार्टीला जे हवे होते ते मी देऊ शकलो नसेन, कदाचित त्यामध्ये मी कमी पडलो असेल ते मी मान्य करतो. त्याचप्रमाणे सेवा हा माझा पिंड आहे, कुटनीती मला कधी जमली नाही राजकारणामध्ये कुटनीती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. पण माझ्या स्वभावात आणि संस्कारात कुटनीती कुठेही नाही. त्यामुळे कदाचित या प्रवाहात कुठेतरी बाजूला राहण्याचा प्रसंग माझ्यावर आला आहे. तरी सुद्धा मी आयुष्यात कुटनीती कुठेही वापरणार नाही. माझी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आणि आग्रह सुद्धा आहे की सर्वांनी शांत राहावं. सेवेचे जे पवित्र कार्य आहे ते आपण करत राहू. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी ज्या पद्धतीने अंत्योदय हा विचार आपल्याला दिला आहे, त्यामुळे शेवटच्या माणसाचं आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये पुन्हा एकदा चांगले परिवर्तन आपल्याला करायचे आहे”.

हे ही वाचा >> कुठल्या दालनात कोणते मंत्री बसणार? अधिवेशनापूर्वीच झालं शिक्कामोर्तब, अजित पवारांना…

माझा पक्षावर रोष नाही : संजय कुटे

संजय कुटे यांनी म्हटलंय की “पद आज आहे उद्या नाही पदामुळे सेवा कार्य थांबता कामा नये. मतदार संघातील जनतेने अतिशय विश्वासाने मला सलग ५ वेळा निवडून दिलं आहे. ज्या विश्वासाने त्यांनी निवडून दिले त्याला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. माझं जे स्वप्न जळगाव जामोद मतदारसंघाबद्दल आहे ते पूर्ण करणारच आहे. या पाच वर्षातील माझं जे व्हिजन आहे ते मी पूर्ण करणार आहे त्यामुळे कुणीही नाराज होऊ नये! पक्षाने हा निर्णय का घेतला असेल हे मी सुद्धा समजू शकलेलो नाही. तसेही तो पक्षाचाच अधिकार आहे आणि आता समजून घेण्याची मला आवश्यकता सुद्धा वाटत नाही. शेवटी मला हेच वाटत आहे कि मीच कुठेतरी यामध्ये कमी पडलो आहे. त्यामुळे कदाचित पक्षाने हा निर्णय घेतला आहे. परंतु, माझा पक्षावर अजिबात रोष नाही”.

हे ही वाचा >> मंत्रिमंडळातून वगळण्यापूर्वी वरिष्ठांनी भुजबळांना दिलेली खास ऑफर; स्वतः माहिती देत म्हणाले, “मी वरिष्ठांना नकार दिला”

नाराजी प्रकट न करण्याचं संजय कुटे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

भाजपा आमदार कुटे म्हणाले, “भाजपा हे आपले सर्वांचे घर आहे आणि घरापासून कधीच रुसायचे नसते घरामध्ये कधीकधी मनाविरुद्ध निर्णय हे होत असतात आणि ते मोठ्या मानाने स्वीकारावे लागतात. हे निर्णय जे स्वीकारतात ते आयुष्यात पुढेच जात असतात. सर्वांनी सकारात्मक भूमिका घेऊन यापुढे कार्य करावे. कुणीही नाराजी प्रकट करू नये. मला जाणीव आहे आपण सर्वजण अतिशय भावनिक झालेले आहात, मतदारसंघातील नाही तर राज्यातील आपल्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता मित्रजन हे अतिशय नाराज झालेले आहेत. सर्वांचे मला फोन येत आहेत. त्या सर्वांचा मी ऋणी आहे कि ते आज भक्कमपणे माझ्या पाठीशी आहेत. आज मला समजले आहे की राज्यात माझा चाहतावर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.माझा माझ्या वरिष्ठांवर विश्वास आहे आणि तो कधीही कमी होणार नाही. आज जे माझ्यासोबत घडलंय त्याचं मी कधीही चिंतन करणार नाही, एक नवी दिशा एक नवी उमंग, नवीन उत्साह आणि पुन्हा नव्याने दिनदलित, शेतकरी शेतमजूर बांधवांच्या सेवेत मी असणार आहे. जे पाच वर्ष पुन्हा मला दिले आहेत त्याचे सोने केल्याशिवाय मी राहणार नाही”.

Story img Loader