सध्या लोकसभा निवडणूक झाली तर महाविकास आघाडीच्या जागांमध्ये वाढ होणार तसेच शिंदे गट-भाजपाच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज ‘सी-वोटर’च्या सर्व्हेद्वारे लावण्यात आला आहे. याच सर्व्हेमुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीने त्यांच्या सध्याच्या जागा राखल्या तरी खूप झाले, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तर सी वोटर सर्व्हेच्या अंदाजापेक्षाही जास्त जागांवर आमचा विजय होईल, असा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. यावरच आता शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शरद पवारांच्या पावसातील सभेचा उल्लेख करत हे अंदाज फेटाळले आहेत.
हेही वाचा >>> Ashish Shelar Death Threat : आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी! वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
शरद पवार यांची एक पावसात सभा झाली होती
२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान शरद पवार यांनी साताऱ्यात पावसात सभा घेतली होती. ही सभा तेव्हा चर्चेचा विषय ठरली होती. या सभेनंतर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बदलले होते. याच सभेचा आधार घेत संजय शिरसाट यांनी सी वोटरचा सर्व्हे खरा ठरणार नाही, असा दावा केला. “सर्व्हेवर अंदाज बांधता येत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पावसात एक सभा झाली होती. त्या सभेने सगळे गणित बदलून टाकले. त्या सभेने सर्व सर्व्हे गुंडाळून टाकले होते. त्या सभेनंतर पश्चिम महाराष्ट्रात वेगळे वातावरण तयार झाले होते. तेथील उमेदवारदेखील पावसाला आताच यायचं होतं का? असे म्हणत होते. सर्व्हेचा अंदाज फक्त त्यांच्या समाधानासाठी चांगला आहे,” असे संजय शिरसाट म्हणाले.
हेही वाचा >>> प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांच्या ‘त्या’ विधानांवरून भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; म्हणाले…
…तेव्हा यांच्यातील मतभेद बाहेर येतील
“संजय राऊतांना या सर्व्हेमुळे खूप आनंद झाला असेल. मात्र प्रकाश आंबेडकरांनी त्यांना त्यांची लायकी दाखवली. महाविकास आघाडीमध्ये जेव्हा युती झाली होती, तेव्हाच मी म्हणालो होतो; की ही युती किती काळ चालेल हे सांगता येत नाही. लोकसभा निवडणूक सध्या दूर आहे. जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक होईल, तेव्हा यांच्यातील मतभेद बाहेर येतील. या मतभेदांनी आता टोक गठले आहे. आघाडीत कधीही बिघाडी होऊ शकते,” असा दावाही त्यांनी केला.