शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झालेले आमदार संतोष बांगर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि वीज कर्मचाऱ्याला फोन करून दमदाटी केली होती. दरम्यान, त्यांनी एका प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे आमदार बांगर हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे. महत्त्वाचं म्हणजे बांगर यांच्याबरोबच त्यांच्या कार्यकर्त्यांनीही याप्राचार्यांना मारहाण केल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, बांगर यांनी नेमकी मारहाण का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून ही घटना १८ रोजी घडल्याची माहिती आहे.
हेही वाचा – “…अन्यथा रट्टे देईन”, संतोष बांगर यांची पुन्हा शासकीय कर्मचाऱ्याला दमदाटी
दरम्यान, बांगर यांनी काही दिवसांपूर्वी वीज कर्मचाऱ्याला फोन करून दमदाटी केली होती. थकीत बिलामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कनेक्शन तोडले होते. ही माहिती गावातील काही आमदार संतोष बांगर यांना दिली होती. यावर आमदार बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन करत दमदाटी केली. “इकडची लाईन तोडू नका, नाहीतर रट्टे देईन,” असा इशारा बांगर यांनी कर्मचाऱ्याला दिला होता. तसेच त्यांनी मंत्रायलाजवळ तैनात पोलिस कर्मचाऱ्याला सुद्धा शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.