साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनावर गुरुवारी सकाळी घडलेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध नोंदवत, आमदार शशीकांत शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे तसेच या प्रकाराला जबाबदार असलेल्यांना पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक करावी, अशी मागणी देखील केली आहे. ”मराठे कधी पाठीमागून वार करत नाहीत समोरून वार करतात.” असं आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पत्रकारांशी बोलताना आमदार शिंदे म्हणाले, ”मराठा समाजाच्या कालच्या आणि उद्याचा लढ्यात आम्ही सहभागी असू पण एकाच पक्षाला कोणी टार्गेट करणार असेल, तरी आम्ही देखील त्याच पद्धतीने उत्तर देऊ. हा प्रकार करणा-याला पोलिसांनी २४ तासांत अटक करावी. कोणी घडवून आणला? त्याच्या हेतूचा शोध लागला पाहिजे.”
तसेच, ”मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. याचिकाकर्ते सदावर्ते त्यांनी सातत्याने शरद पवार, सुप्रिया सुळे व अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. जर याचिकाकर्ते आमचे असते तर त्यांनी अशी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नसती.” असंही शिंदेंनी यावेळी बोलून दाखवलं.
साताऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर दगडफेक; मराठा आरक्षण प्रकरणाचे पडसाद
”राज्यात मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीची भूमिका या समाजाच्या कायम पाठीशी राहणारीच आहे. मराठा आरक्षणाचे राजकारण केलं जात असल्याची खंत व्यक्त करुन शिंदे म्हणाले, महाराष्ट्रातील वातावरण दुषित करण्याचा व शांतता भंग करण्याचे काम कोणी करत असेल तर राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी.” असंही आमदार शिंदे यांनी यावेळी म्हटलं.
”मराठा आरक्षणाबाबत केंद्राने पुढाकार घ्यावा अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहील. याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी तर हात जोडून विनंती केलेली आहे. धनगर आरक्षणात ज्या पध्दतीने वेळ काढूपणा करत राजकारण केले. त्यापध्दतीने मराठा आरक्षणाचे राजकारण करू नये. सगळ्यांनी मिळून या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा. मराठा समाजाची पोटतिडीक असेल तर भाजपाने पुढाकार घ्यावा, आमची तयारी आहे. पण ज्यावेळी मराठा समाज आंदोलनात उतरेल, त्यावेळी आमच्यासारखे कार्यकर्ता या समाज बांधवांसमवेत खांद्याला खांदा लावून लढाईत उतरेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.