माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र आणि अमरावतीचे आमदार रावसाहेब शेखावत यांनी आपल्यावर पिस्तूल रोखल्याची तक्रार काँग्रेसच्याच माजी कार्यकर्त्यांने पोलीस ठाण्यात केल्याने विदर्भातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मुन्ना अलिशा अजहर अली (४४, रा. जमील कॉलनी) असे या तक्रारदाराचे नाव आहे.
मुन्ना अलिशा हा पूर्वी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होता. त्याचा जाहिरात फलक लावण्याचा व्यवसाय आहे. येथील श्याम चौकात सकाळी ८ वाजता तो राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर लावत असताना आमदार रावसाहेब शेखावत, त्यांचे स्वीय सचिव संजय पाटील आणि इतर दोघे गाडीतून तेथे आले. ‘आमचे फलक लावण्याचे सोडून राष्ट्रवादी काँग्रेस, आमदार रवी राणा आणि विश्वास देशमुख यांचे फलक का लावत आहेस’, अशी विचारणा करून शेखावत यांनी शिवीगाळ केली आणि आपल्यावर पिस्तूल रोखली असा आरोप मुन्ना अलिशा याने केला.
या घटनेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी त्याने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा तपास सुरू असून चौकशीअंती पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती ठाणेदार अशोक धोत्रे यांनी दिली आहे. मुन्ना अलिशा काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विश्वास देशमुख यांचा समर्थक असल्याचे सांगितले जात आहे. विश्वास देशमुख आणि रावसाहेब शेखावत यांच्यात अलीकडे वितुष्ट आले आहे. रावसाहेब शेखावत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा वारंवार प्रयत्न केला असता त्यांच्या भ्रमणध्वनीवरून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्याकडून या प्रकरणासंदर्भात कोणते निवेदनही आलेले नाही. या प्रकरणाची राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा