दीपक महाले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेकांचे कितीही गोडवे गात असले तरी ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर शिंदे गट आणि भाजप यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यापर्यंत हा गोडवा अद्यापही पाझरलेला नसल्याचे उघड होत आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे त्याचेच एक उदाहरण म्हणता येईल. खुद्द चुलत बहीण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी तयारी करू लागल्याने आधीच अस्वस्थ असलेले आमदार पाटील यांच्यावर शिवसेनेपाठोपाठ स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनीही पाचोरा नगरपालिकेच्या अनुषंगाने भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने त्यांची पुरती कोंडी झाली आहे. शिवसेना आणि भाजपची कोंडी फोडताना आमदार पाटील यांचे कसब पणाला लागणार आहे.

 अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात घडलेल्या घटनांचे पडसाद जळगाव जिल्ह्यातही मोठय़ा प्रमाणात पडत आहेत. शिंदे गटाचे पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. यातच मुंबईत शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पाचोरा नगरपालिकेत सुमारे दोनशेवर कोटींचा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप करताच, पाचोरा येथेही भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी त्यांची री ओढत पाचोरा नगरपालिकेत सुमारे दोनशे कोटींचा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. आमदार पाटील यांनी या आरोपांवर विशेषत: भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत राज्यात काहीही असले, तरी पाचोरा-भडगाव मतदारसंघात भाजपशी युती अशक्य असल्याचे जाहीर केले आहे.

 पाचोरा नगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी गटाने दोनशे कोटींचे भूखंड लाटल्याच्या आरोपानंतर आमदार पाटील यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आणि अभय पाटील यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले. कोणतेही पुरावे नसताना बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिल्याने स्थानिक पातळीवर भाजपविरोधातील त्यांचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राज्यात शिंदे गट व भाजपची युती असली तरी पाचोरा-भडगाव मतदारसंघात भाजपचे अमोल शिंदे आणि आपले आयुष्यात कधीच सख्य होणार नाही, असे पाटील यांनी नमूद केल्याने याचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा निवडणुकीत निश्चितच पडतील.

विशेष म्हणजे आमदार पाटील यांच्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष बाहेरचे असले तरी घरातूनच त्यांची कोंडी करण्याची तयारी सुरू झाली आहे. घरातून होणारा विरोध कोणालाही त्रासदायकच असतो. पाचोऱ्याचे शिवसेनेचे पहिले आमदार दिवंगत आर. ओ. तात्या पाटील यांची कन्या वैशाली सूर्यवंशी या आमदार पाटील यांच्या चुलत बहीण आहेत. त्यांनी याआधी कधीही राजकीय आकांक्षा व्यक्त केली नव्हती. मात्र आमदार पाटील हे शिंदे गटात जाताच त्यांनी राजकीय आखाडय़ात उडी घेतली आहे. त्यांनी आधी आपण लोकसभा लढविणार असल्याचे जाहीर केले असले, तरी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांनी त्या विधानसभेच्या रिंगणातच उतरण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. वैशाली सूर्यवंशी यांनी आपण वडिलांच्या इच्छेनुसार मातोश्रीसोबत राहणार असल्याचे जाहीर केलेले असल्याने भावाविरुद्ध बहीण अशी राजकीय लढाई सुरू झाली आहे. दिवंगत आर. ओ. पाटील यांच्या नावे असणारे शिवालय हे आमदार किशोर पाटील यांचे संपर्क कार्यालय वैशालीताईंनी ताब्यात घेऊन तिथूनच संपर्काला सुरुवात केली आहे. त्यामुळे आमदार पाटील यांना आता एकाच वेळी घरातील आणि बाहेरील अशा दोन्ही विरोधांना तोंड देत राजकीय वाटचाल करावी लागणार आहे.

पाचोरा-भडगावचे राजकारण..

पाचोरा-भडगाव मतदारसंघ १९७८ ते १९९९ दरम्यान काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचे के. एम. बापू पाटील आणि जनता पक्षाचे ओंकार वाघ यांनी आलटून-पालटून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून अर्थात १९६२ पासून १९९९ पर्यंत येथून मराठा समाजाचाच आमदार निवडून जात होता. १९९९ मध्ये मात्र शिवसेनेचे माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या रूपाने राजपूत समाजातील नेत्याने मतदारसंघावर वर्चस्व मिळविले. त्यांनी ओंकार वाघ आणि नंतरच्या २००४ च्या निवडणुकीत त्यांचे पुत्र दिलीप वाघ यांना पराभूत केले. त्यानंतर आर. ओ. पाटील यांनी पुतण्या किशोर पाटील यांना राजकारणात आणले. सध्या तेच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.