महाराष्ट्रात कोणीही संजय राऊत यांच्या वक्तव्याला फार महत्व देत नाही आणि छत्रपतींच्या घराण्याचे पुरावे मागणाऱ्या व्यक्तीला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकारच नाही. छत्रपतींच्या घराण्याचे पुरावे मागणाऱ्यांना फार महत्व देत नाही असे प्रत्युत्तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राऊत यांना दिले. शिवगर्जना संपर्क अभियानाच्या निमित्ताने साता-यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राऊत यांनी छत्रपतींच्या घराण्यावर टीका केली होती. साताऱ्यात माध्यमांशी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
हेही वाचा >>> “संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही, त्यांच्या तोंडाला…”, गिरीश महाजनांची टोलेबाजी!
छत्रपतींबद्दल आदर म्हणणारे ते पूर्वी कधी आमच्या घराण्याचे आम्हांला पुरावे मागत होते. आज ते कोण आहेत त्याचे पुरावे जनतेला देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आणि आमच्या घराण्याबद्दलचे पुरावे मागणाऱ्या व्यक्तीला आमच्या घराण्यावर बोलण्याचा मुळात अधिकारच नाही. आज महाराष्ट्रात कोणीही संजय राऊत यांच्या वक्तव्याला फार महत्व देत नाही आणि त्यांना गांभीर्यानेही घेत नाही असेही शिवेंद्रसिंहराजें यांनी सांगितले.
छत्रपतींच्या घराण्याबद्दल जर त्यांना आदर होता तर युवराज संभाजीराजे छत्रपती यांना खासदारकीची उमेदवारी का दिली नाही असा सवाल शिवेंद्रसिंहराजेंनी केला. खासदार संजय पवार यांना तिकीट देवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले .
उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असतील तर त्यांनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत असे पूर्वी संजय राऊत म्हणाले होते. याचा धागा पकडून शिवेंद्रसिंहराजे यांनी राऊत यांचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी काही बोललं की लगेच जनते सहनभूती मिळवता येते, म्हणून काही लोक आपल्या पोळ्या भाजण्यासाठी असे उद्योग करत असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनाही बरं वाटतं आणि पक्षही चालतो. मी भाजपचा आमदार झालो माझी नेमणूक जनतेने केली आहे. त्यामुळे त्यांनी छत्रपतीच्या घराण्याविषयी बोलायचं टाळलं तर बर होईल. राऊत यांच्या बोलण्याचा सर्व रोख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. मात्र देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते.
हेही वाचा >>> “गद्दारांना गाडण्यासाठी शिवगर्जना यात्रा”; संजय राऊत यांचा शिंदे गटावर निशाणा
आज उपमुख्यमंत्री आहेत परंतु त्यांच्यामध्ये तेवढा अभ्यास, हिम्मत, धमक,कर्तृत्व आहे. राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. राज्यासाठी ते प्रभावीपणे काम करत आहेत. त्यामुळे त्यांची जात पात धर्म बघण्याचे काही कारण नाही. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होते व अनेक नेतेही होते त्यांनाही हे आरक्षण देता आलं नाही हे त्यांनी दिलं. ते मुंबई उच्च न्यायालयात टिकवलं परंतु महाविकास आघाडीलातील सर्वोच्च न्यायालयात टिकवता आलं नाही. त्यांना महाराष्ट्रातील जनतेची मान्यता ही मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी कोणाविषयी आपण किती बोलतो आणि आपले लोक किती ऐकतात याचाही राऊत यांनी विचार करावा असा सल्ला त्यांनी दिला.