वाई:साता-यात अशांतता पसरविणाऱ्यांचा व तणाव निर्माण करणाऱ्यांचा शोध घ्या . पोलीस यंत्रणा कूठे कमी पडली तर उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागतिली जाईल असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात स्पष्ट केले.समाज माध्यमातून केल्या गेलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे सातारा शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.याविषयी ते पत्रकारांशी बोलत होते.या घटनेमागे राजकीय पाठबळ आहे का याचीही चौकशी करण्याची सूचना त्यांनी केली.
हेही वाचा >>> “संजय राऊतांचं शरद पवारांबद्दलचं वक्तव्य ऐकून लक्षात येतंय की…”, शिंदे गटातील नेत्याचं वक्तव्य चर्चेत
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, समाज माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणा-या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित मुलगा पोलिसांच्या ताब्यात असताना याबाबत पोस्ट आल्या. शहरातील वातावरण जाणून-बुजून दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे.असा प्रयत्न करणाऱ्यांचा पोलिसांनी शोध घेऊन लवकर त्यांना समोर आणले पाहिजे. सातारकरांना विनंती आहे पोलिसांना पोलिसांचे काम करु दे, प्रशासन योग्य कारवाई करेल असा विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि देशा बद्दल चुकीचं बोललेल खपवून घेणार नाही. या बाबत सखोल चौकशी पोलिस विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे.शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले,शहरातील युवकांना भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. पण देशाबद्दल आपल्याला प्रेम असले पाहिजे. एखाद्या पक्षाबद्दल राग असेल म्हणून कोणीही देशावर बोलणे चुकीचे आहे. या घटनेला राजकीय पाठबळ आहे का याची चौकशी करायला पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा >>> “निवडणुकीवेळी लपून बसतात अन्…”, अमित ठाकरेंचा थेट आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
या घटनांच्या बद्दल पालकमंत्र्यांनी सुद्धा कारवाईचे आदेश दिले आहेत. सायबर सेल कुठे तरी कमी पडत आहे. पोलिसांनीच एकदा खरे खोटे तपासावे. शांतता समितीची बैठक घेण्याबाबत मी जिल्हा पोलीस प्रमुखांना बोलणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.
असा प्रकार घडत असताना पोलिस यंत्रणा कुठे कमी पडली का कमी पडली हे नंतर बघता येईल .परंतु आज शहरात तणाव वाढून जो त्रास होत आहे, त्याबद्दल पोलिसांनी तातडीने कारवाई करावी. पोलिसांनी यामागचे मास्टर माईंड न शोधल्यास आम्हांला उपमुख्यमंत्र्यांशी बोलावे लागेल असेही शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटलं आहे. छ.शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांचे कार्यालय गुरुवारी काहींनी फोडले.त्यांनी संग्राम बर्गेंवर नाव न घेता आरोप केले.या आरोपांना संग्राम बर्गेंचे चोख प्रत्युत्तर देत सर्व घटनेची चौकशी करण्याची मागणी केली.