भाजप प्रवेश मुहूर्त लांबल्याने चलबिचल
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली असताना काँग्रेस अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे व पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरूच आहे. परंतु या दोन्ही नेत्यांनी अद्यापि राजकीय निर्णय घेतला नाही. या पाश्र्वभूमीवर अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या संपर्कात नसलेले आमदार म्हेत्रे हे बुधवारी मात्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसले. त्यांची ही उपस्थिती हा देखील राजकीयदृष्टय़ा चर्चेचा विषय झाला आहे.
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे गणेशोत्सवाचे औचित्य साधून दहा दिवस सोलापुरात तळ ठोकून आहेत. शहर व जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते भाजप वा शिवसेनेत दाखल होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर शिंदे यांचा सोलापुरातील मुक्काम महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांचीही आगामी सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे. त्याबाबतची रणनीती आखण्यासाठी शिंदे कुटुंबीय गांभीर्याने पावले टाकत आहेत. शिंदे यांचा सोलापूर लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यामुळे त्यांच्या वलयालाही धक्का बसला आहे.
दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये स्वत:चे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसचे तालुक्याच्या पातळीवरील नेते भाजप किंवा शिवसेना प्रवेशाचा धडाका लावला आहे. या घडामोडीविषयीच्या चर्चेला सुरुवात झाली होती ती अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे व पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेवर. या दोन्ही नेत्यांनी आपल्या समर्थकांच्या बैठकांवर बैठका घेऊ न त्या दृष्टीने हालचालीही चालविल्या होत्या. परंतु त्यांच्यासमोर तेवढय़ाच राजकीय अडचणीही निर्माण झाल्या. विशेषत: स्थानिक भाजपमधून विरोध होऊ लागल्यामुळे म्हेत्रे व भालके यांच्या राजकीय निर्णयाला विलंब होऊ लागला आहे. या दोन्ही नेत्यांनंतर जिल्ह्यात इतर अनेक नेत्यांनी भाजप वा शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात बार्शीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप सोपल, करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल, सोलापुरातील काँग्रेसचे वजनदार नेते, माजी आमदार दिलीप माने आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. परंतु पक्षांतराविषयी चर्चेला सुरुवात केलेले अक्कलकोटचे आमदार म्हेत्रे व पंढरपूरचे आमदार भालके यांना भाजप प्रवेशाचा मुहूर्त अद्यापि लागत नसल्याच्या पाश्र्वभूमीवर आज बुधवारी सुशीलकुमार शिंदे यांना आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे भेटण्यासाठी सोलापुरात आले होते. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित काँग्रेसच्या एका कार्यक्रमात आमदार म्हेत्रे हे सहभागी होऊ न सुशीलकुमार शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने का होईना, आमदार म्हेत्रे हे काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे काँग्रेसच्या वर्तुळात किंचित दिलासा मिळाल्याचे बोलले जाते.