देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर झालेल्या सभेदरम्यान पंतप्रधान मोदी उपस्थित असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात राजकारण रंगलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण करत भाजपचा निषेध केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाणीवपूर्वक भाषण करू न देणं हा भाजपाचा पूर्वनियोजित खेळी असल्याचा आरोप मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला स्थानिक आमदार आणि खासदारांना प्रोटोकॉलप्रमाणे निमंत्रण दिले नसल्याने त्यांनी नाराजीदेखील व्यक्त केली आहे.
हेही वाचा >> औंढा नागनाथमधील मग्रारोहयो घोटाळा प्रकरण; तत्कालीन गटविकास अधिकार्याासह ९ जणांवर गुन्हा दाखल
सुनील शेळके म्हणाले की, “अजित पवार हे स्पष्टपणे बोलणारे वक्ते आहेत. हाच स्पष्टपणा भाजपला रुचणारा नव्हता. त्यामुळे जाणीवपूर्वक अजित पवार यांना भाषण करू न देण हे त्यांचे पूर्वनियोजन होते. पंतप्रधानांनी अजित पवार यांना आपण बोलावं अशी सूचना केली होती. कार्यक्रमापूर्वी अजित पवार यांच्या कार्यालयातून माहिती घेतली. त्यांच्या स्वीयसहाय्यक यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं होतं, की प्रोटोकॉलमध्ये अजित पवार यांचं नाव नाही.”
हेही वाचा >> “संजय राऊतांच्या अंगात आलं अन्…” महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेबाबत विश्वजित कदम यांचं मोठं विधान
“सर्वसामान्य कार्यकर्त्याला जसे निमंत्रण होते त्याचप्रमाणे आम्हालादेखील होते. प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला निमंत्रण यायला हवं होतं. पंतप्रधान यांचं स्वागत करण्यासाठी निमंत्रण नव्हतं किंवा मंदिरात प्रवेश नव्हता. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत कार्यक्रम झाला. मंदिरात कार्यक्रम झाला तिथे ठराविक देवस्थानाची मंडळी आणि भाजपच्या नेत्यांना प्रवेश होता. भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले, चंद्रकांत पाटील यांना त्या व्यासपीठावर घेतलं. पण स्थानिक आमदार, खासदारांना जागा नव्हती का?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.