Sunil Shelke On Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. यातच आज रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षातील काही नेत्यांबाबत सूचक भाष्य केलं. ‘मी कुठेतरी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटत असावं’, असं रोहित पवार कोणाचंही नाव न घेता म्हणाले. त्यांच्या या विधानाचा रोख कोणाकडे होता? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी एक मोठा दावा केला आहे. “रोहित पवार कधीही सत्तेत सहभागी होऊ शकतात”, असं विधान सुनील शेळके यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आमदार सुनील शेळके काय म्हणाले?

“गेल्या एक ते दीड महिन्यांपासून आपण पाहिलं की आमदार रोहित पवार हे नाराज आहेत. त्यांना पक्षात त्यांना डावललं जात आहे. रोहित पवारांना त्यांच्या पक्षाचं (राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष) प्रदेशाध्यक्ष व्हायचं होतं. मात्र, त्यांना ती संधी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. हे त्यांनी त्यांच्या विधानामधून बोलून दाखवल्याचं दिसत आहे”, असं आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

‘रोहित पवारांना सत्तेचा मोह’

“रोहित पवारांना सत्तेचा मोह आता आवरत नाही. त्यामुळे ते सत्तेत कधीही सहभागी होऊ शकतात. मात्र, रोहित पवारांना घेण्यासाठी आमच्या पक्षाचे नेते किती अनुकूल आहेत? हे मला माहिती नाही, कारण महायुतीत आज तरी दुसऱ्या कोणाला घ्यावं अशी मानसिकता कोणाची दिसत नाही”, असंही आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले होते?

तुमच्या पक्षाची एक महत्वाची बैठक झाली, त्या बैठकीत अनेकांना वेगवेगळ्या पदाचं वाटप करण्यात आलं. पण जे रोहित पवार निवडणुकीत मैदानात उतरून लढाई लढत होते, ते यामध्ये कुठेही दिसत नाहीत? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी रोहित पवारांना विचारला, यावर बोलताना ते म्हणाले, “मी आजारी असल्यामुळे मला त्या बैठकीला जाता आलं नाही. त्यामुळे त्या बैठकीत काय चर्चा झाली हे मला सांगता येणार नाही. मात्र, अजूनपर्यंत कुठलीही जबाबदारी माझ्यापर्यंत आलेली नाही. तसेच मला कोणती जबाबदारी दिलेली आहे हे मला कळालेलं नाही. मला जबाबदारी दिली नाही म्हणून मी नाराज आहे असा विषय नाही”, असं रोहित पवार यांनी म्हटलं.

‘मी कुठेतरी कमी पडतोय…’

“माझं म्हणणं एकच आहे की आज लढण्याचे दिवस आहेत, त्यामुळे लढलं पाहिजे. आता राहिला प्रश्न की गेले ७ वर्ष पक्षाच्यावतीने मी लढत असताना मी कुठेतरी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटत असावं त्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला असावा. तसेच काही महत्वाचा निर्णय उद्या घ्यायचा असेल तेव्हा तो निर्णय घेतला जाईल. पण त्या बैठकीत काय चर्चा झाली हे मला सांगता येणार नाही. मी तुम्हाला एवढंच सांगतो की, मी एक आमदार म्हणून पक्षाचा पाठिंबा असला काय आणि नसला काय? पण सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी मी लढत आलो आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मला शरद पवारांचा पाठिंबा राहिलेला आहे. त्यांचा पाठिंबाच माझ्यासाठी सर्वकाही आहे”, असं रोहित पवार यांनी म्हटलं.

Story img Loader