सातारा शहरातील रस्ते करण्याच्या कामात जर काही चुकीचे चालले असेल आणि कामे निकृष्ट दर्जाची व निविदेमधील तरतुदीप्रमाणे होत नसतील तर लोकप्रतिनिधी आणि आघाडीचे अध्यक्ष या नात्याने खरेतर चुकीच्या कामांना आळा घातला पाहिजे. परंतु आमदार ठेकेदारांची बाजू घेत आहेत हे दुर्दैव. रस्त्यावर ए. सी. कोट टेंडरमध्ये तरतूद असताना पावसाळय़ानंतर टाकू असे म्हणणारे हे कोण, असा प्रश्न आम आदमी पक्षाचे जिल्हा संघटक राजेंद्र चोरगे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.
शहरातील रस्त्यांच्या कामाची निविदा ८ ते ९ महिन्यांपूर्वी मंजूर केली. दोन महिन्यांत रस्ते होणे आवश्यक होते तरीसुद्धा ठेकेदारांना सांगून अजून विधानसभा निवडणूक लांब आहे. निवडणुकीच्या अगोदर दोन महिने काम करा, असे सांगितले त्यामुळे आपणच रस्ते वेळेत होऊ नयेत म्हणून प्रयत्न करत आहात, असे चोरगे यांनी म्हटले आहे.
सातारा शहरातील पूर्वीच्या आपल्याच कारकीर्दीमध्ये केलेल्या रस्त्याच्या कामाचा अनुभव सर्व सातारकरांनी शारीरिक दुखणी वाढवून वाहनांचे नुकसान सोसून गेली ४-५ वष्रे अनुभवला आहे. आता तीच वेळ पुन्हा येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. आमचा चांगल्या कामाला विरोध नाहीतर निकृष्ट दर्जाच्या कामाला विरोध आहे. त्यामुळे आमदारांनी जनतेची दिशाभूल करू नये.
ए. सी. कोट अगर सिल कोट १५ ते २० दिवसांत बी. बी. एम. अगर बी. एम. केल्यानंतर टाकले नाहीतर रस्त्यांची मजबुती कमी होते म्हणून पीडब्ल्यूडीच्या नियमांतर्गत बी. एम. अगर बी. बी. एम. केल्यानंतर ए. सी. कोट अगर सिल कोट टाकावाच लागतो, तसे नसते तर निविदेमधील अटीशर्तीमध्ये सदर अॅटम टाकलाच नसता. त्याचप्रमाणे खडीची साईज, रस्त्याची जाडी, डांबराची प्रत व प्रमाण याचीसुद्धा माहिती दिली पाहिजे.
आमदार साहेबांना निकृष्ट का चांगला या मुद्यावर वर्तमानपत्रातून वाद घालण्यापेक्षा पीडब्ल्यूडीचे अभियंते व गुणवत्ता चाचणी विभागातील अभियंते व अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी, आमदार स्वत: व आम्ही तसेच पत्रकार, जनतेच्या समोर क्वॉलिटीची तपासणी करू. जर काम निविदेत नमूद केल्याप्रमाणे होत असतील तर आम्ही या कामाला विरोध करणार नाही. पण जर का काम निकृष्ट व निविदेप्रमाणे होत नसेल तर जनतेच्या पशाचा अपव्यय व नुकसानीचे काय करायचे याचे उत्तर आमदारांनीच द्यावे, असे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
जनतेच्या पशातून होणारे काम चांगलेच झाले पाहिजे. चांगल्या कामासाठी आम्ही आग्रही राहणारच. विधानसभा अगर कोणतीही निवडणूक हे आपले जगण्याचे साधन आहे आमचे नाही, असेही प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla takes the side of road contractor chorge
Show comments