MLA Uttam Jankar On Ajit Pawar NCP : राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन मंत्र्यांचे खातेवाटपही पूर्ण झाले आहे. अशात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी मोठे विधान केले आहे. अजित पवार यांच्याबाबतच्या काही गोष्टी तपासाव्या लागतील आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर जाईन,असे जानकरांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले उत्तम जानकर?

माळशिरसचे आमदार उत्तम जानकर टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. त्यावेळी त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रावादीचे आमदार अजित पवार यांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आले. यावर जानकर म्हणाले, “चर्चा या चर्चा राहतात. लोक अजित पवार यांना काही कामानिमित्त भेटायला जात असतील. उत्तम जानकरला सामावून घेण्याइतके अजित पवार यांचे नेतृत्व मोठे आहे का, हे मला पहिल्यांदा तपासावे लागेल. तेवढे मोठे नेतृत्व असेल तर मी अजित दादांबरोबर जाईन. त्यासाठी अजित दादांची कपॅसिटी पहिल्यांदा तपासावी लागेल.”

ठाकरे, गांधी, केजरीवाल मारकडवाडीत

माळसिरस विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार उत्तम जानकर यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्या मारकडवाडीच्या भेटीबाबात माहिती दिली आहे. आमदार उत्तम जानकर म्हणाले, “उद्धव ठाकरे पाच जानेवारीला मारकडवाडीला येणार आहेत. तर १० तारखेला किंवा एक दिवस मागे-पुढे राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचे मारकडवाडीला येणाचे नियोजन सुरू आहे. यावेळी त्यांच्याबरोबर प्रियांका गांधीही येण्याचा प्रयत्न करणार आहेत. हे लोक इथे गावाने बंड का केले हे जाणून घेण्यासाठी आणि इथे काय झाले हे पाहण्यासाठी येणार आहेत.”

हे ही वाचा : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!

कोण आहेत उत्तम जानकर?

उत्तम जानकर हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार आहेत. २०१९ मध्ये निसटता पराभव स्वीकारलेल्या जानकर यांनी यावेळी भाजपाच्या राम सातपुते यांचा सुमारे १३ हजार मतांनी पराभव केला. यामध्ये विशेष असे की, गेल्या वेळी भाजपाच्या राम सातपुते यांना अकलूजच्या मोहिते पाटलांची साथ असल्याने ते विजयी झाले होते. तर यावेळी जनकरांनाही मोहिते-पाटलांची साथ मिळाली अन् ते विजयी झाले.

दरम्यान मारकडवाडी प्रकरण उत्तम जानकर यांनी उचलून धरले आहे. यासाठी त्यांनी मारकडवाडी येथे शरद पवार यांना बोलावून ग्रामस्थांचे मुद्दे मांडले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla uttam jankar ncp ajit pawar sharad pawar uddhav thackeray rahul gandhi aam