सोळा जागांसाठी आज मतदान
बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याविरुद्ध शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधून परिवर्तन पॅनेल मदानात उतरवले आहे. या निवडणुकीतून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेची राजकीय बांधणीच केली जात असल्याने स्थानिक पातळीवर क्षीरसागर विरुद्ध मेटे असा राजकीय सामना रंगू लागला आहे.
बीड बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक उद्या (रविवारी) होत आहे. अठरापकी दोन जागा बिनविरोध काढून माजी मंत्री क्षीरसागर यांनी पहिल्या टप्प्यातच निवडणूक आपल्या बाजूने ठेवण्यात यश मिळवले. मात्र, १६ जागांसाठी मेटे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय परिवर्तन महाआघाडीने प्रचाराचा धुरळा उडवला आहे. बाजार समितीतील क्षीरसागरांची सत्ता खेचून घेऊन आगामी पालिका, जि.प. व पंचायत समिती निवडणुकीसाठीची राजकीय बांधणी करण्याचा मेटेंचा प्रयत्न आहे.
बीड मतदारसंघातून अवघ्या ५ हजार मतांच्या फरकाने जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून पराभव झाल्यानंतर मेटे यांनी हा मतदारसंघ आपले कार्यक्षेत्र ठरवून कामाला सुरुवात केली आहे. माजी मंत्री क्षीरसागर यांच्याविरुद्ध असणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधून बाजार समितीत महाआघाडी करण्यात मेटेंनी यश मिळवल्याने निवडणुकीत क्षीरसागरांचीही दमछाक झाली. वर्षांनुवष्रे बीड मतदारसंघात सर्व संस्थांवर क्षीरसागरांचे एकतर्फी वर्चस्व राहिले, मात्र मागील काही दिवसांपासून क्षीरसागर विरोधी वातावरण तयार करण्यात मेटे यांनी जोर धरला आहे. बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून क्षीरसागरांच्या विरोधात आरोपांची राळ उडवली. क्षीरसागरांनीही थेट मतदारांशी संपर्क करीत निवडणूक जिंकण्यासाठी सर्व आयुधांचा वापर सुरू केला आहे. बाजार समितीची सत्ता कायम राखण्याचे क्षीरसागरांसमोर मोठे आव्हान आहे.
बाजार समितीच्या माध्यमातून आगामी नगरपालिका, जि.प. या निवडणुकांतही क्षीरसागरांना लक्ष्य करण्याचा पवित्रा मेटे यांनी जाहीर केला. क्षीरसागरमुक्त बीड मतदारसंघ अशी घोषणा करून मेटेंनी रणिशगच फुंकले आहे. बाजार समितीत ३ हजार २१२ मतदार असून, व्यापारी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दोन उमेदवार पूर्वीच बिनविरोध आले. उर्वरित जागांसाठी आता लढत होत असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दोन्ही पॅनेलप्रमुखांनी परस्परांवर आरोपांच्या फैरी झाडत राजकीय वातावरण तापवले आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीतून आमदार मेटेंची राजकीय बांधणी
शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधून परिवर्तन पॅनेल मदानात उतरवले आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 12-06-2016 at 01:29 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla vinayak mete led parivartan panel to contest market committee election