छावण्यांच्या मंजुरीवरून मंत्री पंकजा मुंडे लक्ष्य

बीड : शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. यावेळी बोलताना आमदार मेटे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ज्यांच्याकडे एक वासरुही नाही अशा छावण्यांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगून त्यांनी नाव न घेता पंकजा मुंडेंवर टीका केली.

बीड जिल्ह्याच्या राजकारणात शिवसंग्राम आणि भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आल्याने आमदार विनायक मेटे विरुद्ध मंत्री पंकजा मुंडे असे राजकीय समीकरण तयार झाले आहे. विकासकामांच्या कार्यक्रमातून आमदार मेटे पंकजा मुंडेंवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. श्रीक्षेत्र नारायणगड येथील कार्यक्रमात बोलताना मेटे यांनी आजी-माजी मंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे टीका करत निशाणा साधला. ते म्हणाले, दुष्काळाने हैराण झालेल्या लोकांना आश्रय देण्याऐवजी गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वैरण नाही, पाणी नाही, हाताला काम मिळेना, अन्नधान्य वेळेवर वाटप होत नाही. यामुळे शेतकरी बांधव त्रस्त झालेले असताना त्यांच्यावरच अन्याय केला जात असल्याचा आरोप मेटे यांनी केला. आपल्यातील काही ‘बिभीषण’ विकासकामांचे नारळ फोडण्यासाठी धडपडत आहेत. राजकारणातील हा घाणेरडापणा समाज कार्यातही घुसला असून गेल्या एक महिन्यांपासून दोन हजार जनावरे सांभाळणाऱ्या छावणीला डावलून ज्यांच्याकडे एक वासरुही नाही अशा छावण्यांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगूत मेटे यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री पंकजा मुंडेंवर टीका केली. गेल्या अनेक वर्षांपासून नारायणगड विकासाच्या प्रतीक्षेत आहे. गडावर जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. भाविकांसाठी निवारा व पाण्याची सुविधा नाही. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गडाकडे अनेकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत अनेक वर्ष सत्ता भोगली, मंत्रिपदे भूषविली. मात्र गडाच्या विकासासाठी एक रुपयाही दिला नाही, अशी टीका त्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे नाव न घेता केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गडाचा विकास करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Story img Loader