दिगंबर शिंदे

माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र आमदार विश्वजित कदम यांना काँग्रेसने प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त केले असले तरी या नियुक्तीमुळे काँग्रेसअंतर्गत असलेली गटबाजी संपणार का? हा प्रश्न आहे; पण गलितगात्र झालेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी एवढी मात्रा उपयुक्त ठरेल असे सद्य:स्थितीवरून तरी वाटत नाही. भाजपप्रवेशाचा झंझावात सुरू असताना काँग्रेसच्या गडाचे ढासळते बुरूज डागडुजी करून बंदिस्त करण्याचा हा प्रयत्न कितपत फलदायी ठरतो हे विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून स्पष्ट होणार आहे.

डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विश्वजित कदमांना संधी काँग्रेसने दिली असली तरी अखेरच्या क्षणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची माघार या विजयात महत्त्वाचा वाटेकरी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यामुळे कार्याध्यक्षपदी निवड झालेल्या विश्वजित कदम यांना अगोदर घरच्या मदानावर कडेपूरच्या देशमुख वाडय़ाशी दोन हात करावे लागणार आहेत.

याचबरोबर जिल्हय़ात काँग्रेसअंतर्गत असलेली गटबाजीही संपुष्टात आणून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना विश्वास आणि आश्वासक नेतृत्व देण्याची जबाबदारीही कदम यांना पार पाडावी लागणार आहे. वसंतदादा गटाकडून याला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहणेही अगत्याचे आहे.

राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या दादा घराण्याशी मिळतेजुळते घेत असताना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रचार यंत्रणेवर दादा घराण्याचा फारसा विश्वास नव्हता. लोकसभेचे आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांनी ऐन वेळी स्वाभिमानीची उमेदवारी घेत निवडणुकीच्या मदानात उतरण्याची तसदी घेतली. मात्र तोपर्यंत काँग्रेस उमेदवारीवरून जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यापर्यंत मजल पोहोचली होती. माजी खासदार प्रतीक पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे दादा गटाकडून कदम यांच्या निवडीचे झालेले थंडे स्वागत न सांगता बरेच काही सांगून जाते.

दादा गटामध्येही माजी मंत्री मदन पाटील यांचा गट स्वअस्तित्व राखून आहे. महापालिका निवडणुकीमध्ये कदम गटाच्या साथीने या गटाने उमेदवारीवर प्राबल्य मिळविले होते.

लोकसभा निवडणुकीवेळी खासदारकी वसंतदादा गटाला आणि आमदारकी भाऊ गटाकडे अशी वाटणी झाली असल्याचे सांगण्यात येते. तसेच साखर कारखान्यावर विशाल पाटील यांच्याकडे आणि महापालिका भाऊ गटाकडे असाही अलिखित तोडगा काढण्यात आला असला तरी ज्या वेळी कदम गटाचे नेतृत्व पुढे येते त्या वेळी आजपर्यंतचा इतिहास पुढे येतो. एकमेकाबद्दल असलेले अविश्वासाचे वातावरण दूर करण्याची संधी लोकसभेच्या निमित्ताने समोर आली होती. मात्र या संधीचा ना कदम गटाने लाभ घेतला ना दादा गटाने लाभ घेतला. यामुळे आजही अविश्वासाचे वातावरण कायम आहे.

हा संघर्ष विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी वाटपावरून उफाळून येण्याची चिन्हे आहेत. कदम गटाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असताना दादा गटाकडून म्हणजेच विशाल पाटील यांच्याकडून सध्या तरी सबुरीचेच धोरण घेतले जात आहे.

कदम यांना मिळालेल्या कार्याध्यक्ष पदाची खरी कसोटी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी वाटपावर लागणार आहे. आघाडीतील जागावाटपावरून निर्माण होणारा पेच अगोदर सोडवावा लागणार आहे.  राष्ट्रवादी, स्वाभिमानी विकास आघाडीशी मिळतेजुळते घेण्याचे आव्हान समोर असेल.  काँग्रेसला जिवंत ठेवण्याबरोबरच कदमांना स्वत:च्या मतदारसंघातही आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी झगडावे लागणार आहे. हीच कदमांची कसोटी ठरणार असून यातून उभे राहिले तरच राज्याचे नेतृत्व करण्याची संधी लाभणार आहे.

कदम यांची काँग्रेसने कार्याध्यक्षपदी नियुक्ती करून पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे की, पक्षाची गळती रोखण्याचा प्रयत्न केला आहे हे सध्या तरी कळायला मार्ग नाही. मात्र आपण कॉंग्रेसमध्येच कार्यरत राहणार, भाजपमध्ये जाणार नाही असा खुलासा विश्वजित कदम यांना काही दिवसापूर्वी करावा लागावा यातच याची गणिते दडली आहेत असेही काही निरीक्षकांचे मत आहे.

निवडणुकीत कस

कदम यांना मिळालेल्या कार्याध्यक्ष पदाची खरी कसोटी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी वाटपावर लागणार आहे. आघाडीतील जागावाटपावरून निर्माण होणारा पेच अगोदर सोडवावा लागणार आहे. रुसवेफुगवे बाजूला सारीत एकसंधपणे विधानसभेला सामोरे जात असताना मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी, स्वाभिमानी विकास आघाडीशी मिळतेजुळते घेण्याचे आव्हान समोर असेल. यातून तावून-सुलाखून बाहेर पडलेल्या काँग्रेसला जिवंत ठेवण्याबरोबरच कदमांना स्वत:च्या मतदारसंघातही आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी झगडावे लागणार आहे. याचबरोबर जिल्हय़ात काँग्रेसअंतर्गत असलेली गटबाजीही संपुष्टात आणून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना विश्वास आणि आश्वासक नेतृत्व देण्याची जबाबदारीही कदम यांना पार पाडावी लागणार आहे. वसंतदादा गटाकडून याला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहणेही अगत्याचे आहे.

Story img Loader