काँग्रेसने आमदार झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. दरम्यान, या निर्णयानंतर झिशान सिद्दीकी चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी नुकतेच एक पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांना भेटायचे असेल तर अगोदर १० किलो वजन कमी कर, असे मला सांगण्यात आले, असा गंभीर आरोप झिशान सिद्दीकी यांनी केला. तसेच राहुल गांधी यांची टीम ही भ्रष्ट असल्याचेही ते म्हणाले.
“राहुल गांधींची टीम भ्रष्टाचारी “
“राहुल गांधी यांच्या टीममधील नेते पक्षाला संपवत आहेत. त्यांनी काँग्रेसला संपवण्यासाठी विरोधी पक्षांकडून सुपारी घेतल्याची शंका येते. राहुल गांधी हे आपापलं चांगल्या पद्धतीने काम करतात. मात्र त्यांची टीम ही फारच भ्रष्टाचारी आहे. राहुल गांधी यांच्या टीममधील लोक फार उद्धट आहेत. वेळ आल्यावर सर्वजण याबाबत माहिती देतील. राहुल गांधी यांची टीम पक्षाला नष्ट करत आहे,” अशी टीका झिशान सिद्दीकी यांनी केली.
…नंतर तुझी राहुल गांधींशी भेट घडवून आणतो
“राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये आली होती. तेव्हा मला हकालण्यात आले. राहुल गांधी यांच्या एका जवळच्या व्यक्तीने मला सांगितलं की अगोदर १० किलो वजन कमी कर नंतर तुझी राहुल गांधींशी भेट घडवून आणतो. मी मुंबई युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. माझ्या शरीराची थट्टा करून माझी हेटाळणी करण्यात आली,” असा गंभीर आरोप झिशान सिद्दीकी यांनी केला.
“पदावरून का हटवण्यात आले कल्पना नाही”
दरम्यान, याआधी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवल्यामुळे सिद्दीकी यांनी नाराजी व्यक्त केली होती. लवकरच मी यावर माझी सविस्तर भूमिका मांडणार, असे सिद्दीकी म्हणाले होते. “माझ्यावर काय अन्याय झालेले आहेत, नेमकं काय घडलेलं आहे ते मी या पत्रकार परिषदेत सांगणार आहे. मला पदावरून का हटवण्यात आले याची मला कोणतीही कल्पना नाही. मला साधारण ९० हजार लोकांनी मतदान केले होते. त्यानंतरच मला मुंबईच्या युवक काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मला या ९० हजार लोकांना आता उत्तर द्यावे लागेल,” असा इशारा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला दिला होता.