मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. भारतीय जनता पार्टीनं बंडखोर आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपये देऊन विकत घेतल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान तर ‘५० खोके, एकदम ओके’ अशा घोषणाही विरोधकांनी दिल्या होत्या.

या सर्व घडामोडीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रातील आमदारांना भाजीपाल्याप्रमाणे खरेदी केलं, हे चित्र महाराष्ट्रासाठी शरमेनं मान खाली घालायला लावणारं आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. त्यांनी नुकतंच ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या कार्यालयातील गणपतीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरातही उपस्थित होते.

हेही वाचा- BMC Elections: मनसेशी युती केल्यास भाजपाचं नुकसान, रामदास आठवलेंनी सांगितलं कारण

बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी संबंधित मुलाखतीतून महाराष्ट्रातील विविध राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर आपली मतं व्यक्त केली आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्यासाठी कारणीभूत असलेल्या बंडखोर आमदारांच्या चारित्र्याबाबत विचारलं असता, नाना पटोलेंनी बोचरी टीका केली आहे.

हेही वाचा- “गणपतीनं अमित शाहांना सद्बुद्धी द्यावी” देशातील संपत्ती विकण्यावरून नाना पटोलेंची खोचक टीका, म्हणाले…

महाराष्ट्रातील आमदारांच्या चारित्र्यावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले की, “महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधिंचं गुवाहाटीत ज्याप्रकारे दर्शन घडलं, हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालायला लावणारं आहे. महाराष्ट्रात दबाबतंत्राचा अवलंब करत लोकप्रतिनिधिंना भाजीपाल्यासारखं विकत घेण्याचं काम झालं. या प्रकाराला कुणीही माफ करणार नाही. या गोष्टीची जेवढी निंदा करू, जेवढा विरोध करू, तेवढं कमी आहे. पण जे काही झालं ते चुकीचं झालं आहे. ते महाराष्ट्राची जनता कधीही खपवून घेणार नाही. काँग्रेसकडून त्याचं कधीही समर्थन केलं जाणार नाही.

Story img Loader