राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणू नये. काँग्रेसला परिषदेचे उपसभापतीपद मिळाले तरी समाधान मानू, अशी नरमाईची भाषा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
भाजपला सोबत घेऊन राष्ट्रवादी अविश्वास आणण्याचे निश्चत झाल्याने किमान उपसभापतीपद काँग्रेसकडे राहावे, अशी धडपड चव्हाण करीत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दुसरीकडे, त्यांना प्रदेशाध्यपद मिळाल्याने जाहीर नाराजी व्यक्त करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देऊन तोंडघशी पाडण्याच्या प्रयत्नात असलेल्या चव्हाण यांनी राणे यांचे नाव पोटनिवडणुकीची अद्याप निश्चित झाले नसल्याचे सांगून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. माजी उपमुख्यमंत्री दिवं.आर. आर. पाटील यांच्या तासगाव मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तेथून आबांच्या पत्नी बिनविरोध निवडमून याव्या, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळांनंतर आता अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. तेव्हा सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी, यासाठी आवाज उठवेल, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे. असे असताना फडणवीस यांच्या गृहजिल्ह्य़ातच गुन्हे वाढले असून संपूर्ण राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे, असेही ते म्हणाले.