Maharashtra MLC Election 2024 : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक होत असून उद्या (शुक्रवार, १२ जुलै) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत एकेक मत मौल्यवान आहे. अशातच या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचा शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आणि भाजपाने आपापल्या आमदारांना एकत्र जमवलं आहे. काही पक्षांनी त्यांच्या आमदारांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांमध्ये ठेवलं आहे. अशातच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचं एक मत कोणाला मिळणार असा प्रश्न पडला आहे. मनसेच्या एका मताने विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल बदलू शकतो. त्यामुळे मनसेचं मतं मिळावं यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मनसेचा पाठिंबा मिळावा यासाठी महायुतीने संपर्क साधल्याची माहिती राजू पाटील यांनी काही वेळापूर्वी दिली. राजू पाटील यांनी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की विधान परिषदेला महायुतीच्या बाजूने मत देणार की महाविकास आघाडीच्या? त्यावर राजू पाटील म्हणाले, आमच्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला अद्याप कोणताही आदेश दिलेला नाही. ते सध्या अमेरिकेत आहेत. त्यामुळे माझं त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाही.
पाटील म्हणाले, “आमच्या पक्षाचे नेते नितीन सरदेसाई हे देखील राज ठाकरे यांच्याबरोबर अमेरिकेला गेले आहेत. मी त्यांना फोन केला होता. ते मला म्हणाले, मी राज ठाकरे यांच्याशी बोलून आज रात्रीपर्यंत तुम्हाला निरोप पाठवतो. अद्याप राज ठाकरे यांचा मला कोणताही आदेश आलेला नाही.” यावेळी पाटील यांना विचारण्यात आलं की विधान परिषदेच्या निवडणुकीत एकेक मत महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमच्याशी महायुतीने किंवा महाविकास आघाडीने संपर्क साधला आहे का? यावर पाटील म्हणाले, “दोन्ही बाजूने संपर्क केला गेला आहे. ही महत्त्वाची निवडणूक असल्यामुळे प्रत्येकजण प्रयत्न करतोय. सर्वजण पाठिंब्याबाबत विचारणा करतायत. मात्र, याबाबत अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील.
हे ही वाचा >> “महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकही मुस्लिम आमदार नाही”, समाजवादी पार्टीचं मविआ नेत्यांना पत्र, एमआयएमचा उल्लेख करत म्हणाले…
राजू पाटील कोणाच्या बाजूने मतदान करणार?
नुकत्याच झालेलया शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत मनसेने कोणालाही पाठिंबा दिला नव्हता. मनसेने पक्षाच्या कार्यकर्त्यांना व मतदारंना स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घेण्यास सांगितलं होतं. तशीच स्थिती विधान परिषदेच्या निवडणुकीतही पाहायला मिळणार का? असा प्रश्न विचारल्यावर राजू पाटील म्हणाले, उद्या दुपारपर्यंत राज ठाकरे यांच्याकडून निरोप मिळाला नाही तर मी स्वतः निर्णय घेईन. माझ्या विवेकबुद्धीला पटेल त्यांच्या बाजूने मतदान करेन. आमच्या पक्षात तेवढं स्वातंत्र्य नक्कीच आहे.