विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीच्या नऊ तर महाविकास आघाडीच्या दोन उमदेवारांचा विजय झाला. महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव यांचा समावेश होता. महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसकडे ३७ मते होती. मात्र, प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची केवळ २५ मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसची उर्वरित १२ मते फुटल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, याबाबत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाष्य केलं आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर नाना पटोले यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद सांधला. यावेळी त्यांना काँग्रेसची १२ मते फुटण्याबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना काही आमदारांनी पक्षाशी गद्दारी केली, अशी कबुली नाना पटोले यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
मागच्या विधानपरिषद निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी काही बदमाश आमदारांनी क्रॉस व्होटींग केलं होतं. त्यावेळी ते आमदार कोण होते? याचा पत्ता लागला नव्हता. मात्र, यावेळी आम्ही व्यूरचना आखली होती. या व्यूरचनेत काही बदमाश आमदार अडकले आहेत. त्यांच्याबाबत आम्ही वरिष्ठांना माहिती दिली आहे. ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात काम केलं आहे, अशा लोकांना लवकरच बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, अशी संतप्त प्रतिक्रिना नाना पटोले यांनी दिली.
काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते काम करत आहेत. या कार्यकर्तांच्या मेहनतीने आमदार निवडून येतात. मात्र, काही लोक निवडून आल्यानंतर पक्षाशी विश्वासघात करतात, अशा लोकांना आम्ही लवकरच धडा शिकवणार आहोत. हे लोक कोण आहेत, याची माहिती आमच्याकडे आहे. वरिष्ठांचा आदेश आला, की त्यांची नावे जनतेसमोर येईल, असेही नाना पटोले म्हणाले.
आकडेवारी नेमकी काय सांगते?
या निवडणुकीत काँग्रेसकडे एकूण ३७ मते होती. त्यापैकी काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची २५ मते मिळाली. त्यानंतर काँग्रेसकडे १२ मते शिल्लक होती. या निवडणुकीत ठाकरे गटाकडे १७ मते होती, त्यांना काँग्रेसच्या ६ मतांची गरज होती. मात्र, त्यांना काँग्रेसची केवळ पाच मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसची एकूण सात मते फुटली.
दुसरीकडे अजित पवार गटाकडे एकूण ४२ मते होती. मात्र, त्यांच्या दोन्ही उमेदवारांना एकूण ४७ मते मिळाली. म्हणजे अजित पवार गटाला पाच मते जास्त मिळाली. तर भाजपाकडे एकूण ११५ मते होती. मात्र, भाजपाच्या पाच उमदेवारांना एकूण ११८ मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसची एकूण सात मते अजित पवार गट आणि भाजपाकडे गेली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.