येत्या १२ जुलै रोजी विधिमंडळात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या जागांसाठी महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. लोकसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सर्व ५ उमेदवार निवडून आणण्याचे जोरकस प्रयत्न चालू आहेत. दुसरीकडे शिंदे गट, अजित पवार गट यांच्याकडूनही राजकीय आकडेमोड केली जात आहे. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे गट व शरद पवार गट यांच्याकडूनही आपापल्या उमेदवारांसाठी समीकरणं जुळवली जात असताना नेमका एक पराभूत होणारा उमेदवार कुणाचा असेल? याची चुरस निर्माण झाली आहे.
६ जुलै रोजी विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. कोणत्याच पक्षाच्या उमेदवारांनी माघार न घेतल्यामुळे विधानपरिषद निवडणूक होणार हे निश्चित झालं. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक दोन दिवसांवर आलेली असताना भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी मतांची आकडेमोड केली जात आहे.
पक्षीय बलाबल आणि राजकीय समीकरणं
विधानपरिषद निवडणुकीत ११ जागांसाठी १२ अर्ज आल्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधानसभेतील १४ आमदार कमी झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचं संख्याबळ २७४ झालं असून त्यानुसार विधानपरिषदेच्या प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवणं आवश्यक ठरलं आहे.
भाजपाचे पाचही उमेदवार जिंकून येऊ शकतात!
भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीसाठी पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. विधानसभेत भाजपाच्या १०३ आमदारांचं संख्याबळ आहे. पाच उमेदवार जिंकून आणण्यासाठी ११५ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे वरच्या १२ मतांसाठी भाजपाला मित्रपक्ष व अपक्षांवर अवलंबून राहावं लागेल. पाच अपक्ष आमदार व इतर ७ आमदारांनी भाजपाच्या पारड्यात मतं टाकल्यास भाजपाचे पाचही उमेदवार जिंकून येऊ शकतात.
शिंदे गटाला ९ मतांची आवश्यकता
सत्ताधारी गटातील दुसरा प्रमुख पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट, अर्थात मुख्यमंत्र्यांचा पक्ष. शिंदे गटानं या निवडणुकीत २ उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी ४६ मतांची आवश्यकता असेल. विधानसभेत शिंदे गटाकडे ३७ आमदार आहेत. त्यामुळे वरच्या ९ आमदारांसाठी शिंदे गटाला तजवीज करावी लागेल. ६ अपक्ष आणि बच्चू कडूंच्या दोन आमदारांनी शिंदे गटाच्या उमेदवारांना मतं दिल्यास मुख्यमंत्र्यांचे दोन्ही उमेदवार जिंकून येऊ शकतात.
भाजप नेतृत्वाचे शिंदेंना झुकते माप? महायुतीची धुरा मुख्यमंत्र्यांच्याच खांद्यावर सोपवण्याची शक्यता
अजित पवार गटाचे २ उमेदवार ६ मतांची गरज
तुलनेने अलिकडेच सत्ताधारी गटात सामील झालेले तिसरे सहकारी म्हणजे अजित पवार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं २ उमेदवार उभे केले आहेत. त्यांनाही विजयासाठी ४६ मतांची गरज आहे. विधानसभेत अजित पवार गटाकडे ४० आमदारांचं संख्याबळ आहे. त्याशिवाय इतर ३ आमदारांचं अजित पवार गटाला पाठबळ असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी ३ मतांची कमतरता आहे.
काँग्रेससाठी सोपा पेपर, पण अतिरिक्त १४ मतं सांभाळणं आवश्यक
सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी पक्षांमधील उमेदवारांनाही जिंकून येण्यासाठी आकडेमोड करावी लागणार आहे. काँग्रेस हा लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. पण विधानसभेत महाविकास आघाडीपैकी काँग्रेसकडे सर्वाधिक ३७ आमदार आहेत. काँग्रेसनं फक्त एक उमेदवार निवडणुकीसाठी उभा केला आहे. त्यामुळे काँग्रेसकडे अतिरिक्त १४ मतं अतिरिक्त आहेत. हे १४ आमदार कुणाच्या पारड्यात त्यांची मतं टाकतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरेल.
विधान परिषद निवडणुकीत मराठा आमदार ओबीसी उमेदवारांना मतदान करतील ?
उद्धव ठाकरे गटासाठी काँग्रेसची अतिरिक्त मतं महत्त्वाची
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. पण आवश्यक संख्याबळ २३ असताना उद्धव ठाकरे गटाकडे मात्र विधानसभेत फक्त १५ आमदार आहेत. त्यामुळे विजयासाठी ठाकरे गटाला एकूण ८ मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यासाठी काँग्रेसच्या अतिरिक्त १४ मतांपैकी ७ मतं ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास ठाकरे गटाचा उमेदवार सहज जिंकून येऊ शकतो.
शरद पवार गटाचा शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीला सर्वात जास्त मतांची जुळवाजुळव करावी लागेल. कारण शरद पवार गटानं विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. पण शरद पवार गटाकडे विधानसभेत फक्त १२ आमदार आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या विजयासाठी शरद पवार गटाला एकूण १४ मतांची जुळवाजुळव करावी लागेल.
क्रॉस-व्होटिंगचा सर्वच पक्षांना धसका!
उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारासाठी गेलेली काँग्रेसची मतं वगळून उर्वरीत मतं जरी जयंत पाटलांच्या पाठिशी उभी राहिली, तरीदेखील त्यांना किमान ७ ते ८ मतांची आवश्यकता राहील. अशावेळी सभागृहातील अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची राहील. यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं १, एमआयएमची २, समाजवादी पक्षाची २ आणि शेतकरी कामगार पक्षाचं १ अशा ६ मतांचाही समावेश आहे.
विधान परिषद निवडणूक अटळ; कोणत्याही उमेदवाराकडून माघार नाही; ११ जागांसाठी १२ जण रिंगणात
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व एनडीए आघाडीला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. महाराष्ट्रात भाजपाची मोठी पीछेहाट झाली. भाजपाचं संख्याबळ २३ वरून थेट ८ पर्यंत खाली आलं. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या विधानपरिषद निवडणुका या अवघ्या काही महिन्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. यातील निकाल व लोकसभा निवडणुकीतील कामगिरीच्या जोरावर विरोध पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना नामोहरम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे.
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी कोणते उमेदवार रिंगणार? वाचा यादी
महायुतीचे उमेदवार
भाजपा – पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, सदाभाऊ खोत
शिवसेना एकनाथ शिंदे गट – भावना गवळी, कृपाल तुमाने
राष्ट्रवादी अजित पवार गट – राजेश विटेकर, शिवाजीरावर गर्जे
महाविकास आघाडीचे उमेदवार
काँग्रेस – प्रज्ञा सातव
शिवसेना उद्धव ठाकरे गट – मिलिंद नार्वेकर
राष्ट्रवादी शरद पवार गट – जयंत पाटील यांना पाठिंबा