मुंबई : मुंबई, ठाणे या क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांची उभारणी करताना आर्थिक चणचण सोसत असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आता पालघर, अलिबागमध्येही कोट्यवधींचे प्रकल्प राबवणार आहे. पालघर, वसई, अलिबाग, पेण आणि खालापूरसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती करण्याचा शासननिर्णय नगरविकास विभागाने जारी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई, ठाण्यासह रायगड जिल्ह्यातील काही परिसरात एमएमआरडीए नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत आहे. असे असताना मुंबई महानगर प्रदेशाच्या आसपासचा भाग अर्थात वसई तालुका, पालघर तालुका, अलिबाग, पेण आणि खालापूर परिसराच्या विकासाला मात्र खीळ बसली होती. ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यांचा विकास कोण करणार, यावरून विकासकामांना खीळ बसली होती. निधीचीही चणचण स्थानिक यंत्रणांना होती. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने एमएमआरडीएच्या मार्फत या परिसराचाही विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालघर तालुका, वसई तालुका, अलिबाग, पेण आणि खालापूरपर्यंत एमएमआरडीएची हद्द वाढविण्यात आली. मात्र, एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती न झाल्याने विकासाला गती देता आली नव्हती. आता या परिसरासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती करण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> सत्ताधाऱ्यांचाच गदारोळ; आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळाचे कामकाज ठप्प

सिडकोहद्दपार

राज्य सरकारने ४ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय जारी करत पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील ७२० किलोमीटरच्या कोकण किनारपट्टीवरील १६३५ गावांच्या नियोजनाची जबाबदारी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोला दिली होती. यावरून टीका होताच त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यातच आता एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमताना पालघर आणि अलिबागमधील १७६ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्तीही मागे घेण्यात आली आहे.

योजनांचा आर्थिक भार

विकास जलदगतीने साधता यावा यासाठी पालघर जिल्ह्यातील क्षेत्रासाठी सहायक संचालक नगर रचना, पालघर शाखा आणि रायगड जिल्ह्यातील क्षेत्रासाठी सहायक संचालक नगर रचना, रायगड, अलिबाग यांच्या कार्यालयामार्फत विकास योजना तयार करण्यात येणार आहेत. या विकास योजना तयार करण्यासाठीचा आर्थिक भार एमएमआरडीए उचलणार आहे. तसेच प्रत्यक्ष विकासही प्राधिकरणामार्फतच केला जाणार आहे.

४४६ गावांचा समावेश

तालुका गावे

पालघर २१०

वसई १३

पनवेल ९

खालापूर ३३

पेण ९१

अलिबाग ९०

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda appointment as special planning authority for palghar and alibaug zws
Show comments