टोल मागण्यासाठी कोणी आडवे आले, तर तुडवून काढा, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात रविवारपासून उमटले. मनसेच्या पदाधिकाऱयांनी आणि कार्यकर्त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी टोलनाक्यांची तोडफोड केली. ठाणे, ऐरोली, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील विविध टोलनाक्यांना कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले आणि तिथे तोडफोड केली. सोमवारी सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाक्यावर आंदोलन करून तेथील वाहतूक रोखून धरली. मुलुंडमधील टोलनाक्यावरही मनसैनिकांनी वाहनचालकांना टोल न देण्याचे आवाहन केले. दहीसरमध्ये मनसेचे नेते प्रवीण दरेकर, शालिनी ठाकरे आणि संजय घाडी यांनी टोलनाक्याविरोधात आंदोलन केले. पोलीसांनी या तिघांनाही अटक केली.
नवी मुंबईमध्ये पक्षाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱयाने यापुढे टोल भरायचा नाही, असा आदेशच रविवारी दिला. टोल मागण्यासाठी कोणी आडवे आलेच, तर तुडवून काढा, असेही राज ठाकरे म्हणाले. त्यांच्या या आदेशाचे तात्काळ राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पडसाद उमटले. 
ऐरोलीतील टोलनाका, पुण्यातील चांदणी चौकाजवळील टोलनाका, नागपूरमधील दाभ्याचा टोलनाका, सांगलीतील टोलनाका, बीडमधील आष्टी टोलनाका आणि औरंगाबादमधील करमाड टोलनाक्यावर मनसैनिकांनी रविवारी रात्री तोडफोड केली. सटाणा-देवळा रस्त्यावरील खेलदरे टोलनाक्याचीही रात्री तोडफोड करण्यात आली. 
मनसे आणि टोल..
पुण्यातील चांदणी चौकाजवळील टोल नाक्यावर मनसैनिकांनी तोडफोड केली. याप्रकरणी पक्षाच्या नगरसेविका रुपाली पाटील यांना अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयांनी सोमवारी रुपाली पाटील यांना अटक केली. सोमवारी सकाळी सोलापूर रस्त्यावरील मांजरी येथील टोलनाकाही मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी फोडला. टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्त असतानाही तो फोडण्यात आला. यानंतर लोणी-काळभोर पोलीसांनी महिला कार्यकर्त्यांना अटक केली.
दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर येथील टोलनाक्यावर मनसैनिकांनी सोमवारी सकाळी आंदोलन केल्यामुळे दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर परिणाम झाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईकडे आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक टोलनाक्यावर रोखून धरल्यामुळे दोन्ही बाजूला गाड्यांची मोठी रांग लागल्याचे चित्र सोमवारी सकाळी दिसत होते. टोल कशासाठी वसूल होतोय, हे सांगत नाही, तोपर्यंत कोणीही टोल भरायचा नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते सोमवारी सकाळी खालापूर टोलनाक्यावरील अधिकाऱयांकडे टोल का वसूल केला जातोय, याची विचारणा करीत होते. त्यामुळेच त्यांनी दोन्ही बाजूंची वाहतूक रोखून धरली होती.
मुंबईमध्ये मुलुंड येथील टोलनाक्यावर मनसैनिकांकडून वाहनचालकांच्या गाडीवर मी टोल भरणार नाही, अशा आशयाचे स्टिकर्स चिटकवले जात होते. तसेच टोल घेणाऱया कंपन्यांविरोधात घोषणा देऊन निषेधही केला गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा