राज्यातील काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवरून खाली खेचायचे असेल तर मतविभाजन टाळण्याची खरी गरज आहे. यासाठी सध्याच्या युतीला महायुतीत परावर्तीत करण्यासाठी मनसेने युतीसोबत यावे ही भाजपची भूमिका असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. मात्र, हा निर्णय युतीतील मित्रपक्षांशी चर्चा करूनच घेतला जाईल, अशी सावध भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
सलग तिसऱ्यांदा सत्तेत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारविषयी सामान्य जनतेच्या मनात सध्या तीव्र असंतोष आहे. हे सरकार निवडणुकीच्या माध्यमातून खाली खेचायचे असेल तर विरोधी पक्षांच्या मतांमध्ये दरवेळी होणारे विभाजन टाळणे आवश्यक आहे. सामान्य जनतेला सुद्धा आता या आघाडी सरकारचा वीट आला आहे. त्यामुळे जनतेच्या इच्छेचा मान ठेवत विरोधकांनी एकत्र येणे यात काहीही गैर नाही, उलट जनतेच्या भावनेला दाद देण्यासारखे आहे असे मुनगंटीवार म्हणाले. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून भाजप व शिवसेनेची युती आहे. भाजपचा सर्वात जुना मित्र अशी शिवसेनेची ओळख आहे. त्यामुळे या युतीत नवीन मित्राला सामावून घ्यायचे असेल तर सर्वात आधी शिवसेनेशी चर्चा करणे आवश्यक आहे. अद्याप शिवसेनेशी अशी चर्चा झालेली नाही. सार्वत्रिक निवडणुकांना अद्याप वेळ असल्याने चर्चा सुरू झालेली नाही, असे मुनगंटीवार यांनी आज स्पष्ट केले.
भाजपची भूमिका मात्र या युतीत मनसेने सहभागी व्हावे अशीच आहे. संभाजीनगरला झालेल्या पक्षाच्या कार्यसमितीच्या बैठकीत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी ही भूमिका मांडली होती. त्याच भूमिकेवर पक्ष आजही ठाम आहे. राज्यातील आघाडी सरकारचा पराभव करण्यासाठी मतविभाजन टाळणे किंवा आपापल्या पक्षाची शक्ती वाढवणे हे दोनच पर्याय आहेत. निवडणुका जवळ आल्याने मतविभाजन टाळण्याचा पर्याय योग्य आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला जनतेच्या भावनेची दखल घ्यावी लागते. आघाडी सरकारच्या बाबतीत राज्यातील जनतेच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे येत्या निवडणुका लढतांना सर्वच विरोधी पक्ष याचे भान ठेवतील अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. शेवटी नेत्यांपेक्षा जनतेची भावना नेहमीच श्रेष्ठ ठरते. याची जाणीव सर्वानी ठेवणे गरजेचे आहे, असे सूचक उद्गार त्यांनी काढले.
युतीला महायुतीमध्ये परावर्तित करण्याच्या मुद्यावर सध्या युतीसोबत असलेले रिपाइंचे नेते रामदास आठवले यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. येत्या निवडणुकांमध्ये जागा वाटप महत्वाचे नसून काँग्रेसप्रणित आघाडी सरकारचा पराभव महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader