मराठी आणि बॉलिवूड दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून वादाला तोंड फुटलं आहे. चित्रपटातील व्हीएफक्स आणि सैफ अली खानने साकारलेल्या ‘रावणा’च्या भूमिकेवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराच दिला आहे. यादरम्यान मनसेने मात्र ओम राऊत यांना पाठिंबा दिला असून जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ सिनेमाला पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच चित्रपटावर होणारी टीका दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

अमेय खोपकरांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे –

“ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी लोकमान्य आणि तान्हाजी या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट अँड साऊंड शो आजही दिमाखात सुरु आहे. त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणं दुर्दैवी आहे,” असं अमेय खोपकर म्हणाले आहेत.

“ओम राऊत आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचिती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ चित्रपटाला पूर्ण पाठिंबा आहे,” असं अमेय खोपकर यांनी स्पष्ट केलं आहे.

‘आदिपुरुष’ महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, भाजपाच्या राम कदमांचा इशारा

विश्लेषण : प्रभासच्या बिगबजेट ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदीची मागणी, राजकीय वर्तुळातून गंभीर आक्षेप; नेमकं वादाचं कारण काय?

“मनसे ओम राऊत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. मी त्यांना चांगला ओळखतो. ते अत्यंत हिंदुत्ववादी आहेत. त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही. राम कदम किंवा आपल्याला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे इतर नेते ९५ सेकंदांच्या टीझवरुन सिनेमा कसा असेल याचा कसा काय अंदाज लावू शकतात. लोकांना याचा निर्णय घेऊ द्या,” असंही अमेय खोपकर ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हणाले आहेत.

“चित्रपट प्रदर्शित होऊ द्या, आणि त्यात खरंच देवी-देवतांचा अपमान झाला असेल, तर तेव्हा विरोध करु शकतो. ते तुम्हाला चित्रपट पाहा असं सांगत आहेत. पण आत्तापासूनच एका हिंदू आणि मराठी दिग्दर्शकाचं तुम्ही खच्चीकरण करत आहात. ही योग्य पद्धत नव्हे. त्याचं खच्चीकरण करु नका,” असं आवाहन अमेय खोपकर यांनी केलं आहे.

‘आदिपुरुष’ महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही – राम कदम

भाजपा आमदार राम कदम यांनी नुकतंच याबद्दल दोन ट्वीट केले आहेत. यात त्यांनी आदिपुरुष चित्रपटाला विरोध केला आहे. “आदिपुरुष हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. या चित्रपटात निर्मात्यांनी पुन्हा एका किरकोळ प्रसिद्धीसाठी आमच्या देवी देवतांचं विडंबन करुन कोट्यवधी हिंदू लोकांच्या श्रद्धा आणि आस्थेला ठेच पोहोचवली आहे. आता वेळ आली आहे… या विडंबनाचा फक्त माफीनामा.” असे राम कदम यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

“दृश्यांची काटछाट करून चालणार नाही. अशी घाणेरडी विचारधारणा असलेल्या लोकांना धडा शिकवायलाच हवा. अशाप्रकारच्या कोणत्याही चित्रपटावर कायमची बंदी किंवा संबंधित लोकांनी इंडस्ट्रीत काम करण्यावर काही वर्ष बंदी घालण्यात यावी. जेणेकरून भविष्यात कोणीही पुन्हा असं करण्याची हिंमत करणार नाही. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns amey khopar supports bollywood director om raut over film adipurush prabhas saif ali khan ram ravan bjp ram kadam sgy