बॉलिवुड अभिनेता शाहरूख खानच्या ‘पठान’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. अनेत वादांनंतर अखेर पठान चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र, प्रदर्शनानंतरही या चित्रपटावरून राजकीय चर्चा आणि वाद चालूच आहेत. एकीकडे राज्यात सत्ताधारी आणि विरोधक अशा सामन्यामध्ये मनसेकडून सातत्याने विरोधी पक्षांना लक्ष्य केलं जात असताना दुसरीकडे या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा सुरू झाला आहे. मनसेकडून याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. यासाठी ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वादाचाही दाखला देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपटातील काही दृष्य आणि संवादांवर आक्षेप घेत इतिहासाची मोडतोड केल्याचा दावा करत जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी ठाण्यातील एका मॉलमध्ये चित्रपटाचा शो बंद पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटकही करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणाचा संदर्भ देत मनसे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे.
“आव्हाड आता कुठे गेले?”
‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वेळी प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठान’ मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना जितेंद्र आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?” असा प्रश्न अमेय खोपकरांनी उपस्थित केला आहे.
‘पठान’ चित्रपट आणि वाद
पठान चित्रपटावरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद पाहायला मिळत आहे. आधी दीपिका पदुकोणनं घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे चित्रपटावर आक्षेप घेण्यात आला. सेन्सॉर बोर्डापर्यंत हे प्रकरण गेलं. तिथे सुनावणी झाल्यानंतरही चित्रपटाच्या प्रदर्शनाला काही भागात विरोध करण्यात आला. आसामच्या मुख्यमंत्र्यांना तर स्वत: शाहरूख खाननं रात्री २ वाजता फोन करून लक्ष घालण्यास सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर पठान प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर पठाननं मोठा गल्ला जमा केल्याचं सांगितलं जात आहे.